ठाणे : सुरज वॉटर पार्कचे व्यवस्थापक लक्ष्मण कटी यांना मारहाण करणारे मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून कोणालाही अद्याप अटक केलेली नसल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.घोडबंदर रोडवरील सुरज वॉटर पार्कमधील शिवाजी हेलाले आणि पुरंदर पाटील या दोन मराठी कामगारांना अलीकडेच कामावरून काढले होते. त्यामुळे इतर कर्र्मचारी नाराज होते. याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखालील १५ ते २० कार्यकर्ते ३० नोव्हेंबर रोजी सुरज वॉटर पार्क येथे गेले होते.त्यावेळी ‘आमच्या माणसांना काढता तुम्ही’ असे म्हणत त्यांनी सुरज वॉटर पार्कच्या कार्यालयात तोडफोड केली. सीसीटीव्हीचीही तोडफोड करून व्यवस्थापक कटी यांच्या श्रीमुखात लगावली. शिवाय, त्यांना बघून घेण्याची धमकीही दिली.याप्रकरणी वॉटर पार्कचे पर्यवेक्षक सागर यादव यांनी रविवारी (१ डिसेंबर रोजी) कासारवडवली पोलीस ठाण्यात मारहाण आणि धमकी दिल्याची अविनाश जाधव, मंजुळा डाकी आदींसह २० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात अविनाश जाधव यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.>चौकशी सुरूसूरज वॉटर पार्कच्या दोन कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याच्या मुद्द्यावरून अविनाश जाधव आणि त्यांच्या सहकाºयांनी व्यवस्थापकाला जाब विचारून मारहाण केल्याचा गुन्हा रविवारी दाखल झाला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे.- अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट, परिमंडळ-५
मनसेच्या १५ जणांविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 5:38 AM