ठाणे : ठाणे, मुंबईसह चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या चेतन नरेश माचरे ऊर्फ उन्नीस ऊर्फ लोटस ऊर्फ लोकेश (रा. दोस्ती बिल्डिंग, चितळसर मानपाडा, ठाणे) या गुन्हेगारास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने बुधवारी दुपारी अटक केली. त्याला कोपरी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि मुंबई या चार जिल्ह्यांतून तडीपार केलेला चेतन माचरे हा ठाण्यातील कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात येणार असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार रूपवंतराव शिंदे यांना मिळाली होती. त्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास कोपरी भागातून त्याला अटक केली. त्याला २४ फेब्रुवारी २०२० रोजी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने चार जिल्ह्यांतून हद्दपार केले होते.
याच आदेशाचा भंग केल्याचे आढळल्याने ठाणे पोलिसांनी त्याला कलम १४२ अन्वये पुन्हा ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.