गणेश देशमुख - मुंबई/ठाणे : एमएमआरडीएने बांधलेल्या आणि ठाणे महापालिकेच्या अखत्यारितील सदनिका लाखोंच्या पागडीवर परस्पर भाड्याने देणाऱ्या रॅकेटविरुद्ध डायघर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले. ‘लोकमत’ने हे प्रकरण लोकदरबारात मांडले होते.ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक तथा उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी १० जणांविरुद्ध शासनाची फसवणूक, विनापरवानगी घरात घुसणे, कटकारस्थान, मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा, फसवणूक, छळ आदी नऊ गुन्हे नोंदवले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांनी या सदनिका सील केल्या आहेत. पालिका कर्मचारी अनिल बागडे लिफ्ट व पाण्याच्या तक्रारींची पाहणी करण्यासाठी गेले असता, तेथे रिक्त असलेल्या महापालिकेच्या ताब्यातील सदनिकांमध्ये अनोळखी संशयास्पद व्यक्ती राहात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा एकूण १९ सदनिकांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भाडेकरार करून अनधिकृत वापर करत असल्याचे आढळले. त्यामुळे तातडीने या १९ सदनिका स्थावर मालमत्ता विभागाच्या पथकाने सील केल्या आहेत.
फसवणूक करणारे दहा आरोपीया आरोपींमध्ये विजय रमेश चव्हाण, सुनील हरिप्रसाद रायबोले, खलील शेख, फरहत शेख, विजय हिरालाल जयस्वाल, फैमिना अहमद शेख, एम. एम. अन्सारी, मोहम्मद नादीर शकील अहमद, मुसाफिर हुसेन, शोएब मोहम्मद अन्सारी यांचा समावेश आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण? : मुंब्रा, शीळ येथे एमएमआरडीएने बांधलेल्या प्रकल्पबाधितांसाठीच्या इमारतीतील अनेक सदनिका आरोपींनी भाड्याने दिल्या. त्यासाठी लाखोंची पागडी घेतली. एमएमआरडीएचे बनावट अलॉटमेंट लेटर दिले आणि ॲग्रिमेंट तयार केले. दाराची कुलपे बदलली. महेश आहेर यांनी त्यांच्या सहीचे बनावट अलॉटमेंट लेटर, भाडे करारनामे पुरावा म्हणून पोलिसांना सादर केले.