-अजित मांडकेराजकारणाच्या गुन्हेगारीकरणापासून कोणताही पक्ष सुटलेला नाही. शिवसेना असो किंवा भाजप अथवा राष्टÑवादी काँग्रेस किंवा कॉंग्रेस सर्वच पक्षांमध्ये गुन्हेगारांनी आश्रय घेतलेला आहे. किंबहुना वाल्याचा वाल्मीकी होण्याकरिता गुन्हेगारांनी राजकारणात प्रवेश केल्याची अनेक उदाहरणे ठाण्यात दिसून येतात. राजकारण करायचे असेल आणि आपली दबंगगिरी शाबूत ठेवायची असेल तर गुंडांचा आसरा घ्यावा लागतो, हे ठाण्यातील राजकीय मंडळींनी कृतीतून दाखवून दिले आहे. ठाण्यात स्व. आनंद दिघे यांच्या कार्यकाळापूर्वीपासून राजकारणातील गुन्हेगारांचा वावर असल्याचे दाखले जुनेजाणते देतात. त्यातूनच ठाण्यात नगरसेवक श्रीधर खोपकरची हत्या झाली.
खोपकर यांनी महापौर निवडणुकीत पक्षाच्या आदेशाविरुद्ध बंड पुकारले आणि काही दिवसांतच त्यांची निर्घृण हत्या झाली होती. त्यावेळी संशयाची सुई थेट दिघेंपर्यंतही गेली होती. त्यांना आणि शिवसेनेच्या इतर काही नेत्यांना या प्रकरणात जेलची हवा खावी लागली होती. अनेक नगरसेवकांची धरपकड झाली होती. अनेक नगरसेवकांवर त्यावेळेस ‘टाडा’अंतर्गत कारवाईही झाली होती. दिघे यांच्यावरही ‘टाडा’खाली कारवाई झाल्यानंतर त्यांच्या नावाअगोदर ‘धर्मवीर’ ही पदवी लागली.
राजकारणातील त्यांची लोकप्रियता वाढली. यानंतरच्या काळात अनेक गुन्हेगारांनी वाल्याचा वाल्मीकी होण्यासाठी राजकारणात प्रवेश केला आणि नगरसेवकपासून ते थेट खासदारकीपर्यंतचा प्रवास केला आहे. परंतु राजकारणात वेळप्रसंगी काही गुंडांना हाताशी धरुन त्यांनी आजही आपला दबदबा कायम ठेवला आहे. याच काळात अनेक गँगवारही घडल्याचे किस्से ठाण्यात चवीने चघळले जातात. त्यावेळेस हातात तलवारी असायच्या, कालांतराने तलवारींची जागा रिव्हॉल्व्हरने घेतली. त्यानंतर आता धमकावणे, ब्लॅकमेलिंग करणे आदी स्वरुपात राजकारणाचे गुन्हेगारीकरण बदलले आहे. मधल्या काळात परिवहन समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकाने विरोधात मतदान केले आणि त्याची शिक्षा तेव्हाचे उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना भोगावी लागली होती. तब्बल १४ दिवस ते या घटनेनंतर गायब होते. परंतु या प्रकरणाचे पुढे काय झाले, याचा पत्ता नाही. परंतु या प्रकरणात अनेक दिग्गज नेत्यांची, नगरसेवकांची नावे तेव्हा पुढे आली होती. स्थायी समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पालिकेत अनेकदा गुन्हेगारांचा वावर दिसून आला आहे.
ठाण्यात स्थायी समिती निवडणुकीच्या निमित्ताने झालेली पळावापळवी आणि मारामारी ८ ते १० वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. त्यानंतर २०१४ च्या आसपास कोपरीमध्ये पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कॉंंग्रेस आणि शिवसेनेतील गुन्हेगारीचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ समस्त ठाणेकरांनी अनुभवले होते. शांत समजल्या जाणाऱ्या कोपरीत या काळात सकाळपासून सायंकाळपर्यंत गुन्हेगारांचा मुक्तसंचार होत होता. त्यानंतर पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेऊन वातावरणातील तणाव कमी केला. मात्र राजकीय दबावापुढे तेही हतबल झाल्याचे दिसून आले होते. शहर विकास विभागातील एक प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. शहर विकास विभागातील टेंडर अमुक एकाच व्यक्तीला मिळावे, यासाठी थेट दुबईवरुन फोन केले गेले होते. त्यामुळे महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले होते. मधल्या काळात विटावा येथे झालेले हत्या प्रकरणही चांगलेच गाजले होते. याप्रकरणी राजा गवारी याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.आता तर तब्बल १४ ते १८ प्रकरणांत दोषी असलेल्या एकाच वेळेस अनेक जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका गुंडाची आश्चर्यकारक निर्दोष सुटका झाली आहे. विदर्भातील भाजपच्या एका नेत्याच्या तो निकट असल्याची चर्चा आहे. सध्या त्याने ठाण्यातून आमदारकीचे तिकीट मिळावे, यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.
राष्टÑवादी काँग्रेस किंवा शिवसेनेतील काही नेत्यांच्या अवतीभवती सध्या नव्या फळीतील गुन्हेगार दिसतात. मुंबईतील एका आमदाराच्या जवळ असलेल्या एका गुंडाने सध्या ठाण्यात आपले बस्तान बसवले आहे. तो शिवसेना नेत्यांच्या जवळ असून त्याचे बॅनर, पोस्टर सध्या ठाण्याच्या विविध भागांत झळकताना दिसत आहेत. काही ‘यू-ट्युब भाई’ सध्या ठाण्यात झळकत असून अशाच काही मंडळींना हाताशी धरुन ठाण्यातील राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील राजकारणात एकेकाळी गुंडांचा राजकारणी आपल्या राजकारणाकरिता वापर करीत होते. मात्र आता गुंडांनी थेट ठाण्याच्या राजकारणात शिरकाव केला आहे.
ठाण्यातील राजकारणाचा गुन्हेगारीशी असलेला संबंध चार वेळा अधोरेखित झाला आहे. नगरसेवक श्रीधर खोपकरची हत्या, स्थायी समितीच्या निमित्ताने झालेली पळवापळवी, मारामारी, शहर विकास विभागातील गाजलेले टेंडर वॉर आणि निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी बाळगलेली गँगस्टर मंडळी आणि त्यातून झालेला राडा, अशा काही घटनांमुळे ठाण्यातील राजकारण रक्तरंजीत असून धमक्या, ब्लॅकमेलिंग आदी सर्व हातखंडे येथील नेते वापरत आले आहेत.