- नारायण जाधव ठाणे : गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पालघर जिल्हा पुरताच हादरून गेला आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात तेथे एक हजाराहून अधिक धक्के जाणवल्याची नोंद नॅशनल जिआॅग्राफिकल इन्स्टिट्यूट या संस्थेनेकडे आहे. शाळांसह घरांना तडे गेले असून, रहिवासी भयभीत झाले आहेत. मात्र, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने केवळ १५ लाखांचा मदत निधी वितरित करण्यास गुरुवारी मान्यता दिल्याने, हे भूकंपग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना पालघर जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.ही मदत ग्रामस्थांना तंबू बांधण्यासाठी, ताडपत्री उपलब्ध होण्यासाठी असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता, गेल्या तीन महिन्यांपासून पालघर, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके भूकंपाच्या धक्क्यांनी पुरते भयभीत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भूकंपाचा धक्का बसल्यानंतर झालेल्या धावपळीत एका बालकाचा मृत्यू झाला होता. अनेक भागांतील रहिवासी आजही घरात राहायला तयार नाहीत. शाळांमध्ये जायला विद्यार्थी धजावत नाहीत. त्यामुळे केवळ १५ लाखांचा निधी वितरित करून शासनाने थट्टा मांडली आहे काय? असा सवाल येथील लोकप्रतिनिधींनी केला आहे.>नुकसान झालेल्या आदिवासींची नोंद नाहीभूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यात असून, आतापर्यंत २.४ ते ४.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत. यामुळे अनेक शाळांसह दीड हजारांवर घरांना तडे गेले आहेत. दुर्गम भागातील आदिवासीपाड्यांतील घरांची नोंद अद्यापही सुरू आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे, परंतु आतापर्यंत कुणालाही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. विद्यार्थी शाळेत जायला तयार होत नसल्याने, त्यांचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान होत आहे, परंतु मदत व पुनर्वसन विभागाने यासाठी भरीव मदत करण्याऐवजी केवळ १५ लाख रुपयांची मदत २८ फेबु्रवारीला वितरित केली. त्यातून तंबूसाठी ताडपत्र्या घ्याव्यात, असे स्पष्ट केले आहे. मग यामुळे घरांचे नुकसान झालेल्या रहिवाशांसह शाळांचे नुकसान कसे भरून काढावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.
संकट डोंगराएवढे; मदत मात्र तुटपुंजी, पालघरच्या भूकंपवासीयांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 3:25 AM