कल्याण : कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमाला महापौरांना आमंत्रित न केल्यामुळे शिवसेना नाराज आहे. दुसरीकडे शिवसेनाही भाजपाच्याच पावलावर पाऊल ठेवून नवी मुंबईत झालेल्या आदित्य ठाकरेंच्या एका कार्यक्रमात वागली आहे. त्याठिकाणी स्थानिक आमदाराला निमंत्रण नसणे हा सत्तेचा गैरवापरच आहे. दोन्ही राजकीय पक्षांनी शिष्टाचार न पाळणे ही लोकशाहीची थट्टा असल्याची खरमरीत टीका माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस संजीव नाईक यांनी केली.
कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा रविवारी लोकसंवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झाले. त्यावेळी नाईक प्रमुख वक्ता महणून बोलत होते. शिबिराला डॉ. वंडार पाटील, पारसनाथ तिवारी, माया कटारिया, माजी नगरसेवक जव्वाद डोन, जे.सी. कटारिया, सारिका गायकवाड, सुरेश जोशी, सुरेंद्र म्हात्रे, सुभाष गायकवाड, उमेश बोरगांवकर, प्रसन्ना अचलकर, राजेंद्र नांदोस्कर आदि आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नाईक यांनी शिवसेना-भाजपाच्या कुरघोडीच्या राजकारणावर भाष्य केले. मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमावर टीका करताना ते म्हणाले की, ज्या मेट्रोचा डीपीआर तयार नाही, त्याचे भूमिपूजन केले जात आहे, हे हास्यास्पद आहे.
नाईक यांनी कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासासाठी नवी मुंबई पॅटर्न या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कल्याणच्या राजकारणात राष्ट्रवादीने इतिहास घडवित आघाडी आणि युती सरकारच्या काळात अडीच वर्षे केडीएमसीत सत्ता मिळविल्याची आठवणही त्यांनी सांगितली.१९९९ ला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हा पक्षात येण्यासाठी चढाओढ होती. नेते येतात भाषणे करून जातात, पण कार्यकर्ता एकनिष्ठेने काम करीत आहे. अनेक भिंती पडल्या पण पाया कार्यकर्त्यांच्या रूपाने अजून शाबूत आहे आणि याच ताकदीवर नवीन भिंत आपण पुन्हा बांधू हा विश्वास आहे. घड्याळाची टिकटिक पुन्हा सुरू झाली आहे. आता राज्य तसेच स्थानिक पातळीवर जोमाने पक्षाची वाटचाल सुरू आहे, असे नाईक म्हणाले.कल्याण-डोंबिवलीप्रमाणे नवी मुंबईची लोकसंख्याही १५ लाखांच्या आसपास आहे. नवी मुंबईचा नियोजनबद्ध विकास झाला आहे. सिडकोने हे शहर वसविले असले तरी दूरदृष्टी असलेले नेतृत्व गणेश नाईक यांच्या रूपाने या शहराला मिळाले आहे. आघाडी सरकारच्या काळात कल्याण-डोंबिवली शहरात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीचा प्रस्ताव होता, पण स्थानिक सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने तो मान्य केला नाही, याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले. डी. वाय. पाटील यांनी कल्याणमध्ये मेडिकल महाविद्यालय उभारणीचा दिलेला प्रस्तावही फेटाळण्यात आला. आघाडी सरकारने हजारो कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला, मात्र टक्केवारीच्या नादात पालिकेतील सत्ताधाºयांना कामांचा दर्जा राखता आला नाही, अशी टीका त्यांनी केली. यावेळी ’पवार साहेब एक सर्वव्यापी नेतृत्व’ या विषयावर प्रदेशाध्यक्ष वक्ता सेलचे प्रदीप सोळुंखे यांनीही मार्गदर्शन केले.जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांची पाठदरम्यान, राष्ट्रवादीचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. त्यांना विश्वासात न घेता कार्यक्रम झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. यामुळे गटबाजी आणि मानापमानाचे नाट्य अद्यापही राष्ट्रवादीत सुरू असल्याचे दिसून आले. आयोजकांनी मात्र आम्ही अध्यक्षांना कल्पना दिली होती. ते येतील असे सांगितले. पण हनुमंते कार्यक्रमस्थळी फिरकलेच नाहीत. दरम्यान स्थानिक वरिष्ठ पदाधिकारीच अनुपस्थित राहिल्याने गटबाजीला खतपाणी मिळत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. यासंदर्भात हनुमंते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी एका अन्य कार्यक्रमात व्यस्त असल्याचे सांगून बोलण्यास नकार दिला.