मीरा रोड - राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पुरामुळे लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना मीरा भाईंदर भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने आयोजित नाचगाणे व त्यावर पैसे उडवणे, मिमिक्रीचा समावेश असलेल्या कजरी महोत्सवावर टीकेची झोड उठत आहे. विशेष म्हणजे आयोजकांनी या नाचगाण्याच्या कार्यक्रमाच्या फलकावर शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका यांचे छायाचित्र देखील वापरले.भाईंदरच्या इंद्रलोक येथील प्रमोद महाजन सभागृहात रविवारी रात्री अभियान संस्था व भाजपाच्या उत्तर भातीय मोर्चाच्या वतीने कजरी महोत्सव व स्त्री शक्ती सम्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या जाहिरात फलकावर हसतमुख नेत्यांच्या छायाचित्रां सोबत शहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका यांचे देखील छायाचित्र वापरण्यात आले होते. तर कार्यक्रम ठिकाणी भाजपाची सदस्य नोंदणीचे अर्ज भरून घेतले जात होते.या वेळी शहराच्या महापौर डिंपल मेहता व आमदार नरेंद्र मेहतांसह उत्तरप्रदेश सरकारच्या चित्रपट महामंडळाचे राज्यमंत्रीचा दर्जा असलेले अध्यक्ष तथा मिमीक्री करणारे राजु श्रीवास्तव, राज्य शासनाच्या फिल्मसीटीचे अध्यक्ष अमरजित मिश्रा, उत्तरप्रदेशचे खासदार रमापती त्रिपाठी, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष देवीप्रसाद उपाध्याय, लल्लन तिवारी आदी उपस्थित होते. भोजपुरी गाणी गाण्यात आली. त्यावर नाचसुद्धा केला गेला. यावेळी नोटा देखील उडवण्यात आल्या.राजू श्रीवास्तव यांनी आपली मिमिक्री सादर करत आ. मेहतांसह सर्व उपस्थितांना हसवून सोडले. परंतु राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण, खान्देश आदी भागात पुराने हाहाकार माजवला असताना भाजपाने आयोजित केलेल्या या नाचगाण्याच्या आणि मिमिक्रीच्या कार्यक्रमावर टीकेची झोड उठत आहे. त्यातच शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नींचे छायाचित्र देखील या कार्यक्रमासाठी वापरण्यात आले होते.भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी कजरी महोत्सवाच्या आड नाचगाणे, मिमिक्री आणि पक्षाची सदस्य नोंदणी सारखे प्रकार करताना निदान राज्यातील भयाण पूरस्थितीचा विचार केला पाहिजे होता. शहीद पत्नी कनिका राणे यांचे छायाचित्र कुठे वापरावे याचे भान ठेवले पाहिजे होते, अशी टीका उत्तर भारतिय समाजाचे अमित तिवारी यांनी केली आहे. घडला प्रकार चुकीचा होता. तर देवीप्रसाद उपाध्याय यांनी मात्र केवळ उत्तर भारतीयांना लक्ष्य केले जात आहे, असे सांगत अन्य समाजाचे कार्यक्रम देखील होत असताना त्यावर कोणी बोलत नाहीत.
भाजपाच्या कजरी महोत्सवातील नाचगाणे, मिमिक्री कार्यक्रमावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 10:02 PM