कुमार बडदे - मुंब्राः शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदच्या खरेदीसाठी मुंब्य्रातील बाजारपेठांमध्ये गुरुवारी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची झुंबड उडाली होती. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेल्या स्थानिक नागरिकांमुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. तसेच मुख्य रस्त्यावर ठराविक काळाने वाहतूककोंडीदेखील होत होती.कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सकाळी ११ नंतर विविध ठिकाणच्या शहरांमध्ये व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करावे लागत आहेत. ते व्यापारीही मुंब्य्रात व्यवसायासाठी आले होते. रेडीमेड कपडे, नमाजसाठी लागणाऱ्या टोप्या, चादरी, खिडक्यांचे पडदे, चपला, महिलांची प्रसाधने, मेंहदी, इमिटेशन ज्वेलरी, ईदसाठी बनविण्यात येणाऱ्या व्यंजनासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या शेवया, मावा, काजू, बदाम आदी प्रकारचा सुकामेवा तसेच दूध प्राधान्याने खरेदी करण्यात येत होते. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये ज्या व्यवसायावर निर्बंध घालण्यात आली आहेत ते केश कर्तनालय, कपडे, हार्डवेअर, चप्पल विक्री आदी सर्व प्रकारची येथील दुकानेदेखील ईदच्या पार्श्वभूमीवर बिनधास्तपणे सुरू होती. इतर शहरांमधील बहुतांश नागरिक, व्यापारी लॉकडाऊनचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करीत असतानाच मुंब्य्रात खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो बघून सर्वसामान्य नागरिक मात्र आश्चर्य व्यक्त करून पोलीस आणि महापालिकेविरोधात संताप व्यक्त करीत होते.
‘ठामपाकडून कोणतीही परवानगी नाही’ईदसाठी तीन दिवस व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आल्याची चर्चा स्थानिक व्यावसयिकांमध्ये दिवसभर सुरू होती. मात्र, अशी कोणतीही परवानगी ठाणे महापालिका प्रशासनाने दिलेली नसल्याची माहिती सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी ‘लोकमत’ला दिली.