ठाणे : राज्य शासनाने गुरुवारपासून पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचारबंदीतून रेल्वे सेवा काही अंतर दूर असल्याचे दिसून आले़ ठाणे रेल्वेस्थानकात नेहमीप्रमाणे तिकीट खिडकीवर गर्दी दिसून आली. अत्यावश्यक सेवेतील नाही, तर सर्वांनाच तिकीट दिले जात होते. तसेच रेल्वेत नेहमीसारखी गर्दी दिसत होती.
राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतरही लोकलमधील गर्दीत फारसा फरक दिसला नाही. ठाणे रेल्वेस्थानकात प्रवेशासाठी काेणतेही निर्बंध नव्हते. आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावलेले दिसले नाहीत. तिकीट खिडक्यांवरही सर्वांना तिकिटे दिली जात हाेती़ तसेच आरपीएफ आणि जीआयपीही प्रवाशांचे आयकार्ड किंवा क्यूआर कोड तपासत नव्हते. राज्य सरकारकडून रेल्वेस्थानकात काेणाला प्रवेश द्यायचा किंवा द्यायचा नाही याबाबतचे लेखी आदेश अद्याप रेल्वेला दिलेले नाहीत़ तसेच निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीलाही बोलावले नव्हते. त्यामुळे रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश दिला जात होता. तिकीट खिडक्यांवरही तिकीट घेण्यासाठी आलेल्या सर्वांना तिकीट दिले जात होते. तसेच, नेहमीप्रमाणे रेल्वेत गर्दी दिसून येत होती. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दाेन दिवसांत गर्दीचे निरीक्षण करून मगच लोकलच्या फेऱ्या कमी करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.