डोंबिवली - खच्चून भरलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात पाय ठेवायला जागा नसतांनाच एवढ्या प्रचंड गर्दीत फलाट क्रमांक ३ वर उतरलेल्या एका गरोदर मातेला प्रसुतिच्या वेदना असह्य झाल्या. त्यामुळे फलाटामध्ये उपस्थित असलेल्या महिला रेल्वे पोलीस, प्रवास करणा-या नर्स आदींनी तातडीने आडोसा करत जागा करुन त्या महिलेची प्रसुति केली. महिलेने मुलाला जन्म दिला, आणि त्यानंतर अल्पावधीतच लोहमार्ग पोलीसांनी बाळासह मातेला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याची घटना बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास घडली.जास्मीन शब्बीर शेख (२९)रा. गुप्ते नगर ,वावेघर ,चाळ क्रमांक३, खोली क्रमांक १२, खडवली, पूर्व असे त्या गरोदर मातेचे नाव आहे. जास्मीन दिरासह खडवली स्थानकातून बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या लोकल मधुन कामा हॉस्पिटल, मंबई येथे जात होती. ती लोकल डोंबिवली स्टेशन येथे अली आसता त्याना प्रसुतिच्या वेदना जास्त प्रमाणात होऊ लागल्याने ती तिचे दिरासह डोंबिवली स्टेशन प्लॅटफॉर्म न ३ वर उतरली. त्यावेळी गरोदर मातेला मदत करण्यासाठी स्थानकातील महिला, पुरुष लोहमार्ग पोलीसांनी आडोसा बघत जागा केली. फलाटातील सह महिला प्रवाशांनी तातडीने प्रसंगावधान राखले, त्यातच दोन प्रवासी नर्स म्हणुन जात होत्या, त्यांनीही महिलेची अवस्था बघत तात्काळ प्रथमोपचार केले, तेवढ्यात प्रस्तुती झाली, जास्मीनने गोंडस मुलाला जन्म दिला. लोहमार्ग पोलीसांनी तातडीने गरोदर मातेस व नवजात बाळाला शात्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली येथे उपचारार्थ दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश पवार यांनी दिली. तेथे त्या दोघांवर औषधोपचार सुरु असून ते सुखरूप असल्याचे महिलेचे दीर नामे सुलेमान शेख यांनी सांगितले.
गर्दीच्या रेटारेटीत डोंबिवलीत गरोदर मातेने दिला मुलाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 9:04 PM
फलाट क्रमांक ३ वरची घटना; माता, बाळ सुखरुप
ठळक मुद्देबाळासह मातेला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याची घटना बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास घडली.तेथे त्या दोघांवर औषधोपचार सुरु असून ते सुखरूप असल्याचे महिलेचे दीर नामे सुलेमान शेख यांनी सांगितले.