उल्हासनगर: शहरातील जपानी व गजानन कपडा मार्केट, फर्निचर मार्केट, जीन्स मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट आदी मार्केटची भुरळ शेजारील शहरात असून हजारो नागरिकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये एकच गर्दी केल्याचे चित्र आहे. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाला हक्काचे पार्किंग मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने पुढाकार घेऊन, पालिकेकडे तात्पुरत्या स्वरूपाचे पर्यायी पार्किंगसाठी जागा देण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगरातील मार्केट राज्यात प्रसिद्ध असून राज्यातून नागरिक शहरातील विविध मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी दरवर्षी येतात. कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर, नागरिकांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली. जपानी व गजानन मार्केट, जीन्स मार्केट, घाऊन मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, फर्निचर मार्केट, बॅग मार्केट गर्दीने फुलून गेले. मात्र मार्केट परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने, रस्त्यात वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी युटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, कार्याध्यक्ष दीपक छटवानी यांनी वाहतूक पोलीस विभाग व महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून गोलमैदानसह परिसरातील तीन ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंगसाठी जागेची मागणी केली.
महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास, त्याची सर्व व्यवस्था व्यापारी संघटना करेल. महापालिकेवर एक पैसा भुदंड पडू देणार नाही, अशी माहिती दिपक छतवानी यांनी दिली. यामध्ये व्यापाऱ्यांचे हित असले तरी, त्याचा फायदा शहराला होणार असल्याचे छतवानी म्हणाले. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी वाहतूक पोलीस विभाग व महापालिका अधिकाऱ्याची बैठक घेऊन ब्रम्हाकुमारी आश्रमसह शहरातील विविध विभागात वाहतूक कोंडी झाल्या निमित्त आमदार कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला वाहतूक विभागाचे अधिकारी गोरक्षनाथ वाघ, महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी आदी उपस्थित होते. ब्रम्हाकुमारी आश्रमाला यावेळी भेट देऊन आमदारांनी चर्चा केली.