ठाणे : कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठाण्यातील कोठारी कंपाउंड येथील ‘द सिक्रेट रेस्टॉरंट’वर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून मालक, व्यवस्थापकासह दहा जणांविरुद्ध शनिवारी कारवाई केली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करून बेकायदा गर्दी होत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला मिळाली होती. त्याचबरोबर तिथे मादक पदार्थांचेही सेवन होत असल्याची माहिती मिळाली होती. त्याच आधारे गुन्हे शाखा युनिट पाच आणि एकच्या पोलीस पथकाने शनिवारी रात्री १० च्या सुमारास संयुक्तपणे कारवाई करून या रेस्टॉरंटवर छापा टाकला. त्यावेळी ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी जमवून हॉटेलमध्ये ग्राहकांना मद्य विक्री केल्याचे आढळले. याप्रकरणी सुनील अलवा, दीपक खारकर, जय सरनोबत, तरणसिंग डलग, सीताराम शेट्टी, क्लेवन डिसुझा, पृथ्वी गणेश आंपट, मरेशकुमार रावल, मारुती सोनू गायकवाड आणि मार्तंड गावंडे आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.