ठाणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवार रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे घरातील सामान घेण्यासाठी संध्याकाळी ठाण्यातील मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. ठाणे नगर पोलिसांच्या वतीने नियम पाळा असे आवाहन करीत होते. परंतु, तरीही नागरिक दुकानांसह मार्केटमध्ये गर्दी करतच होते.
राज्यात आता पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्याच्या मार्केटमध्ये किराणामालाच्या दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसत होते. भाजीची खरेदी, किराणा सामान भरण्यासाठी नागरिकांनी मार्केटमध्ये गर्दी केली होती. त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना कुठेही दिसत नव्हते. तसेच काहींच्या तोंडाला मास्कदेखील नीटसा लावला गेला नसल्याचे दिसत होते. त्यामुळे वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी ठाणे नगर पोलिसांच्या वतीने गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, तोंडाला मास्क वापरा असे आवाहन करण्यात येत होते. परंतु, नागरिक मात्र रात्री ८च्या आत घरी जाण्यासाठी दुकानांमधून सामान घेण्यासाठी घाई करताना दिसत होते. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस दुकानदारांना दुकान जाऊन समजविण्याचादेखील प्रयत्न करीत होते.
पुढील १५ दिवस अत्यावश्यक सेवेतील किराणा मालाची दुकाने, मेडिकल व इतर अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना सुरू राहणार आहेत. असे असेल तरीदेखील बंदोबस्तावर असलेले पोलीस जाऊ देतील का नाही? याबाबत नागरिकांच्या मनात धास्ती असल्याने त्यांनी मार्केटमध्ये गर्दी केल्याचे दिसत होते.