ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील झपाट्याने विस्तारणाऱ्या दिवा व दातिवली या उपनगरांमधील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तेथे मलनिस्सारण केंद्र (एसटीपी), तसेच मल उदंचन केंद्रांच्या (पम्पिंग स्टेशन) उभारणीसाठी आवश्यक आरक्षण फेरबदलांना राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर शासनाने याबाबतची अधिसूचना काढली आहे. यापैकी दिवा व दातिवलीतील भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असल्यामुळे ते विकसित करण्यापूर्वी ठामपाला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटीची मंजुरी घेणे आवश्यक आहे.शासनाने संचालक, नगररचना यांचा अभिप्राय घेऊन साबे वगळता, अन्य सर्व ठिकाणच्या आरक्षण फेरबदलांना मंजुरी दिली आहे. ती विकसित करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता घेणे, तसेच महापालिकेने तेथे पोहोचमार्ग उपलब्ध करण्याचेही बंधन आहेनगरविकास विभागाच्या मंजुरीमुळे दिवा, दातिवली, देसाई, डावले आणि शीळ या उपनगरांमध्ये एसटीपी आणि पम्पिंग स्टेशन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या उपनगरांमधील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन येथे एसटीपी व पम्पिंग स्टेशन्स व्हावीत, यासाठी कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व दिवा येथील नगरसेवक माजी उपमहापौर रमाकांत मढवी, शैलेश पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार ठाणे महापालिकेने या दोन सुविधांसाठी आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव नगरविकासकडे पाठविला होता. यानुसार, दिवा येथे सहा हजार, दातिवली येथे सात हजार व ६२५ चौ.मी., साबे येथे १६ हजार, देसाई येथे पाच हजार व ४०० चौ.मी., डावले गाव येथे ४०० चौ.मी. आणि शीळ येथे प्रत्येकी ४०० चौ.मी.चे दोन भूखंडांवरील आरक्षण बदलांसाठीचा प्रस्ताव महापालिकेने गतवर्षी १४ मार्च रोजी नगरविकास विभागाकडे पाठविला होता.
दिवा, दातिवली ही ठाणे महापालिकेची झपाट्याने विस्तारणारी उपनगरे असून, गेल्या काही वर्षांमध्ये येथील लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे नागरी सुविधांवर ताण येत आहे. या आरक्षण फेरबदलांमुळे नागरी सुविधांच्या निर्मितीला चालना मिळेल.- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा मतदारसंघ