सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरु झाली असून त्यासाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशके या निविष्ठा मंजुरीचे नियाेजन करण्यात आले आहे. शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या नियाेजनात यंदा जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर भात लागवडीसह अन्य खरीप पिकांच्या खरीपाखालील क्षेत्र सर्वसाधारणपणे ६५ हजार हेक्टर एवढे निश्चित केले आहे. त्यासाठी भाताचे २२ हजार क्वींटल बियाणे व ५५ टक्के बदल अपेक्षित धरून १२ हजार १०० क्विंटलन बियाण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.
भात बियाण्यांचा पुरवठा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व विविध खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांमार्फत हाेईल. याशिवाय ११ हजार ३९० मे.टन रासायनिक खतांची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. तर जिल्ह्यासाठी १० हजार ५२० मे.टन खतांचा साठा मंजूर झाला आहे. यानुसार आज अखेर जिल्ह्यात दाेन हजार मे.टन खते उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे २० ते २५ हजार लिटर विविध किटकनाशके व बुरशीनाशकांची मागणी करण्यात आली आहे. रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी यांना आळा घालण्यासाठी व कृषि केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना केल्याचे सुताेवाच ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले.