मुरबाड : शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरत असतानाच, मुरबाड तालुक्यातील इंदेगावातील तरुण शेतकरी सोमनाथ बोराडे यांनी शेतात अमेरिकेत उत्पादन घेतल्या जाणाऱ्या ‘जुकिनी’ या फळभाजीची लागवड केली आहे. सिंझेटा फाउंडेशन इंडिया या सामाजिक संस्थेने त्यांच्या शेतातील २० गुंठे जागेत प्रायाेगिक तत्त्वावर जुकिनीची लागवड केली आहे.
बोराडे हे शेतीत नेहमीच निरनिराळे प्रयाेग करत असतात. त्यांनी सिंझेटा फाउंडेशन इंडिया पालघर प्रोजेक्ट अंतर्गत या स्वयंसेवी संस्थेचे प्रणय देसले यांनी जुकिनी या फळभाजीची बाेराडे यांच्या २० गुंठे शेतीत लागवड केली आहे. हे पीक अमेरिकेत माेठ्या प्रमाणात घेतले जाते. या भाजीला पंचतारांकित हाॅटेल, माॅलमध्ये मोठी मागणी आहे.
हिरवे व पिवळे अशा दाेन प्रकारांतील साधारण ४०० ग्रॅमचे हे फळ असते. बोराडे यांच्या २० गुंठे जागेत दोनशे ग्रॅम बियाण्यांची लागवड केली आहे. दोन रोपांमध्ये दोन फूट व ओळीत तीन फूट अंतर ठेवून ही लागवड केली आहे. या भाजीला बाजारात शंभर रुपये किलोपर्यंत दर मिळत असून, ३५ दिवसांनंतर उत्पन्न सुरू होते. एकरी सहा टन उत्पादन मिळू शकते, अशी माहिती प्रणय देसले यांनी दिली आहे.
मॉलमध्ये मागणी देसले यांच्या मार्गदर्शनाखाली बोराडे यांनी या भाजी पिकाची उत्तम निगा राखल्याने दर्जेदार उत्पादन मिळत आहे. या भाजीला थेट मुंबईच्या व्यापारी मॉलमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.