ठाणे : ढोलताशा पथकांचे तालबद्ध-लयबद्ध सादरीकरण, मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके, रिदमिक व अॅक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक खेळाडूंच्या थक्क करणाऱ्या कसरती, ठसकेबाज लावणी आणि ठाणेकरांना ठेका धरायला लावणारे कोळीनृत्य अशा विविध सादरीकरणांनी रविवारी ठाणे महापालिका आयोजित कला-क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे ठाणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर महापौर संजय मोरे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जय जय महाराष्ट्र माझा, सारे जहाँ से अच्छा या सुरावटी बॅण्ड पथकाने आळवल्या. त्या वातावरणात राज्यभरातून आलेल्या खो-खो व कबड्डी संघांच्या खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलन केले. भगवे ध्वज डौलाने फडकवत ढोलताशांच्या गजरात ३०० हून अधिक मुलामुलींनी लेझीम नृत्य साकारले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजीव मेहरा, इशांत नकवी आणि महेंद्र चिपळुणकर यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर, नृत्यमय गणेशवंदना सादर करण्यात आली. ठाण्यातील ढोल पथकांमधील ३०० जणांनी साकारलेल्या ढोलताशांच्या जुगलबंदीने क्रीडा संकुलाचा परिसर दणाणून गेला. गायक नंदेश उमप यांनी सादर केलेल्या पोवाड्याला रसिकांची दाद मिळाली. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे यांची विद्यार्थ्यांनी साकारलेली देवीस्मृती उल्लेखनीय ठरली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, तुम्हारी अदा पे वारी वारी, ज्वानीच्या आगीत मशाल हाती, दिल चीज क्या... या गाण्यांवर मेघा घाडगे व मानसी आठवले यांनी नृत्य सादरीकरण केले. विवेक सोनार आणि मनाली देव यांचा संगीतनृत्यातील आगळावेगळा नृत्याविष्कार ठाणेकरांनी अनुभवला. त्यानंतर, सादर करण्यात आलेल्या कोळी नृत्यांवर ठाणेकरांनी ठेका धरला. एकामागून एक सादर झालेल्या कोळी नृत्याला ठाणेकरांनी टाळ्यांची दाद दिली. अप्रतिम कसरती करून कसरतपटूंनी ठाणेकरांचे मन जिंकले. रिदमिक जिम्नॅस्टिक तर ठाणेकरांच्या चांगलेच पसंतीस उतरले. तरु णाईला थिरकवणाऱ्या धमाकेदार नृत्याने समारोप झाला. विश्वविक्रमी १००१ धावांची कामगिरी करणाऱ्या प्रणव धनावडेचा २५ हजार रु पये देऊन सत्कार करण्यात आला. तर, महोत्सवानिमित्त काढलेल्या पुस्तिकेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या महोत्सवाला मिळालेला ठाणेकर कलाकार-खेळाडूंचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षी आणखी भव्य स्वरूपात महोत्सव साजरा केला जाईल, अशी घोषणा महापौर संजय मोरे यांनी केली.या वेळी आयुक्त संजीव जयस्वाल, विधानपरिषद उपसभापती वसंत डावखरे, खा. राजन विचारे, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, आ. प्रताप सरनाईक, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी, क्र ीडा समितीचे सभापती संभाजी पंडित व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती भागवत, कुणाल रेगे यांनी केले.
ठाणेकरांना सांस्कृतिक मेजवानी
By admin | Published: February 02, 2016 1:54 AM