प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मनोगत आणि आठवणी असलेली पुस्तके ही समाजाचा खऱ्या अर्थाने सांस्कृतिक इतिहास असतात. हा इतिहास रंगभूमीच्या अभ्यासकांनी लिहावा असे मत लेखक व अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले.
कृष्णा प्रकाशनतर्फे मराठी ग्रंथ संग्रहालय येथे सुप्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक कुमार सोहोनी लिखित 'सखे सोबती" या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक विजय जोशी आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व अभिनेते अभिराम भडकमकर यांच्या उपस्थितीत झाले. नलावडे म्हणाले की, आमच्या आयुष्याचा इतिहास सोहोनी यांनी त्यांच्या पुस्तकात मांडला आहे. त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या कामाची दखल घेतली.
कुबल म्हणाल्या की, माहेरची साडी आणि इतर चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्दर्शकांना भेटले, त्यांच्यासोबत काम करतात. पण, सोहोनी यांनी जे शिकवलं ती शिदोरी घेऊन पुढे चालते आहे. जोशी म्हणाले की, सोहोनी यांच्या नाटकाच्या तालमीत हसतखेळत वातावरण असतं. राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत ठाणे शहराला त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून दिला. सुरुवातीला त्यांच्या पुस्तकावर आधारित अभिवाचन सुनील गोडसे, नीना शेटे, सुरभी भावे, श्रद्धा पोखरकर व प्रियांका तेंडोलकर यांनी केले. त्यानंतर प्रकाशक विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक तर सोहोनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन वृंदा दाभोलकर यांनी केले.