डोंबिवली : श्वास चित्रपटाच्या कथालेखिका माधवी घारपुरे यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यालयास भेट दिली. साहित्य संमेलनात आपले कथाकथन ठेवावे, अशी सूचना त्यांनी आयोजन समितीला केली आहे. विविध सूचनांमुळे कार्यक्रमांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात संधी देता आली नाही, तर पुढील वर्षी आगरी महोत्सवात कथाकथनाचा कार्यक्रम घेण्याचा मानस आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी व्यक्त केला आहे. आयोजन समितीने घारपुरे यांचा हृद्य सत्कार केला. तेव्हा, डोंबिवलीने मला मोठे केले, अशी भावना घारपुरे यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणुकीच्या मतदारयादीत घारपुरे यांचे नाव नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयोजक आगरी युथ फोरमने घारपुरे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर, रविवारी सायंकाळी घारपुरे यांनी संमेलन कार्यालयास भेट दिली. घारपुरे यांनी सांगितले, आताच्या काळात मी डोंबिवलीत हवे होते. डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि मी ठाणेकर आहे. मात्र, ३६ वर्षे मी डोंबिवलीकर होते. डोंबिवलीने मला मोठे केले. डोंबिवली साहित्य संस्कृतीची पंढरी आहे. या पंढरीत सारस्वतांचा मेळा भरणार आहे, ही बाब मला आनंददायी वाटते. डोंबिवलीतील साहित्य व संस्कार फार चांगले आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नक्कीच चांगले आणि यशस्वी होणार, यात दुमत आणि शंका नाही. डोंबिवलीकरांचा सुसंस्कृतपणाचा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी लतादीदींनी गाणे गायले नाही, म्हणून प्रेक्षक चिडले होते. त्यावेळी दिवंगत शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र वाजपेयी यांनी प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. तेव्हा, संयम दाखवून डोंबिवलीकरांनी सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले होते. असे अनेक किस्से आहेत. डोंबिवलीत गोविंद तळवलकर, विश्वास मेहेंदळे, वि.दा. करंदीकर असे अनेक दिग्गज्ज वास्तव्यास होते. डोंबिवलीला साहित्य संस्कृतीची परंपरा आहे. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष वझे यांनी सांगितले, डोंबिवलीत ‘श्वास’ नसल्याने आमचा श्वास गुदमरतोय. त्यामुळे घारपुरे यांचे ठाण्याला जाणे मनाला चुकचुक लावणारे ठरले आहे. संमेलनाला त्यांनी उपस्थित राहावे. तो डोंबिवलीकरांचा सन्मानच ठरेल. (प्रतिनिधी)विद्यार्थी संमेलन २१ जानेवारीलासाहित्य संमेलनानिमित्त कल्याणला कार्यक्रम व्हावे, यासाठी साहित्यिकांसोबत आयोजकांची नुकतीच एक बैठक पार पडली होती. कल्याणमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचा विचार पुढे आला होता. २१ जानेवारीला विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचे ठरले आहे. महिला मेळावा १२ डिसेंबरला : साहित्य संमेलनात महिलांचा सहभाग असावा. महिलांचा एक कार्यक्रम असावा. त्यासाठीही नुकतीच एक बैठक पार पडली होती. त्यानुसार, महिला मेळावा १२ डिसेंबरला घेण्याचे ठरले आहे. महिला मेळावा सकाळी १० ते ११.३० या वेळेत पीअॅण्डटी कॉलनीत, ११.३० ते १२ या वेळेत ब्राह्मण सभागृहात, ३.३० ते ४.३० यावेळेत ओंकार इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात पार पडणार आहे. संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी बदलापुरात २५ व २६ डिसेंबरला कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे.
सुसंस्कृत डोंबिवली शहराने मला मोठे केले!
By admin | Published: January 15, 2017 2:41 AM