मीरा रोड : मीरा रोड येथील ३१ वर्षीय शोएबला गेली ६ महिने घासभर अन्न गिळता येत नव्हते. काहीही खाल्लं तर उलटून पडत होते. त्यामुळे तो फक्त पाण्यावर दिवस काढत होता. शोएबच्या अन्ननलिकेला ‘अकायला झिया’ हा आजार झाल्याचे निदान झाले. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना शोएबवर शस्त्रक्रिया करण्यात यश आले असून आता त्याची प्रकृती उत्तम आहे.शोएबला सुरुवातीला अपचन आणि गॅसेसचा त्रास झाला. त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसातच त्याचे वजन झपाट्याने कमी होऊन तब्येत खालावली. मित्राने त्याला मीरा रोडमधील खाजगी हॉस्पिटलमधील आतड्याचे सर्जन डॉ. इमरान शेख यांना भेटण्यास सांगितले. डॉ. शेख यांनी सर्व तपासण्या केल्यावर अन्ननलिकेचा अकायला झिया आजार झाल्याचे निदान केले. डॉ. शेख म्हणाले की, आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेतून जठरात जाते. अन्ननलिका व जठरामध्ये गोलाकार रिंग (वॉल्व्ह ) असते व ही रिंग अन्न हळू हळू आपल्या जठरात सोडत असते. या आजारात ही रिंग आकुंचन पावून जठरात अन्न सोडण्याची प्रक्रिया बंद करते. या रिंगमुळे जसे अन्न हळू हळू जठरात जाते, तसेच ते अन्ननलिकेत येत नाही.शोएबच्या बाबतीत ही रिंग पूर्णपणे आकुंचन पावून बंद झाली होती. त्यामुळे कार्डीओमायोटोमी शस्त्रक्रिया करावी लागली. यात लॅप्रोस्कोपीच्या मदतीने रिंगचा आकार मोठा केला व जठराचा आकारही थोडा कमी केला. यामुळे खाल्लेले अन्न सहजपणे जठरात जाऊ शकेल व ते जठरातून परत मागे येणार नाही, अशी व्यवस्था झाली. या शस्त्रक्रियेनंतर पेशंट दोन तासातच पूर्वीसारखा खाऊ-पिऊ शकतो. शस्त्रक्रियेनंतर शोएबचे वजन गेल्या दहा दिवसात चांगले वाढले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अन्न पचनाची प्रक्रिया व्यवस्थित होत नसेल तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा, असे हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख रवी हिरवानी यांनी सांगितले.
६ महिने उपाशी शस्त्रक्रियेने बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:24 AM