कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी गुरुवारपासून सुरू झालेली संचारबंदी ही केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बंद दुकानांपुरतीच मर्यादित असल्याचे दिसून आले. अनेक नागरिक बिनकामाचे शहरात फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्याविरोधात पोलीस व केडीएमसी अधिकारी कारवाई करत नसल्याने त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा आवाहन करण्यात आले असताना शहरात सकाळपासून विनाकारण नागरिक बाहेर पडले हाेते. सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रहदारी दिसून आली. चौकात पोलीस बंदोबस्त व महापालिकेचे कारवाई पथक होते. त्यांच्याकडून मुक्त संचार करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई केली गेली नाही. त्यामुळे नियम न पाळताच कोरोना कमी कसा होणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत हाेता. अत्यावश्यक सेवेतीलच कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार बुधवारपासूनच रेल्वेस्थानकात कल्याण पश्चिम आणि पूर्व भागात दोनच ठिकाणी प्रवेश खुला ठेवला होता. बांबू आणि दोरीचे बॅरिकेट्स बांधण्यात आले होते. सकाळी रेल्वेस्थानकात प्रवाशांची कोणतीही विचारपूस केली जात नव्हती. त्यामुळे सामान्य प्रवासीही थेट रेल्वेने प्रवास करताना दिसून आले.
दुपारी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांना तिकीट दिले गेले. याप्रकरणी रेल्वे अधिकारी राजेंद्र गुजर यांनी सांगितले की, सकाळपर्यंत आदेश न आल्याने सकाळी सर्वसामान्यांना प्रवेश दिला गेला. आता फक्त ओळखपत्र तपासून तिकीट दिले जात आहे. कल्याण बसडेपोतूनही सर्व ठिकाणच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या गेल्या. त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले.
फोटो-कल्याण-रेल्वे स्टेशन
--------------------