लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर ठाणे जिल्हयाच्या सीमाही वाहतूकीसाठी बंद केल्या आहेत. मात्र, तरीही रुग्णवाहिका, दूधाचे टँकर किंवा मिळेल त्या वाहनातून धोकादायकरित्या प्रवास करणाºया ४९० प्रवाशांवर तसेच तीन हजार ८५ वाहनांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली आहे. यामध्ये ११ लाख ४६ हजारांचा दंडही वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांसाठी लागू केली आहे. त्यानुसार सीआरपीसी १४४ अन्वये संचारबंदीची अंमलबजावणी झाली आहे. तरीही अनेक नागरिक शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही विनाकारण क्षुल्लक कारणे दाखवून घराबाहेर पडत आहेत. बरेच कामगार हे अन्य राज्यात किंवा जिल्हयामध्ये स्थलांतरासाठी रस्त्यावर येऊन मिळेल त्या वाहनाने गावी जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. ठाणे ग्रामीणच्या हद्दीतून जाणारे मुंबई - नाशिक, मुंबई- अहमदाबाद, कल्याण अहमदनगर आणि ठाणे काशीमीरा या मार्गावर या मार्गावरुन विनाकारण धोकादायकरित्या २६ वाहनांमधून मार्गक्रमण करणाºया ४९० प्रवाशांना नाकाबंदी दरम्यान पकडले आहे. तर मोटार वाहन कायद्याचा भंग करणाºया तीन हजार ८५ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल केला आहे. २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याबाबत ३१७ आरोपींविरुद्ध १७२ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २६ वाहने जप्त केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली.
‘‘ संचारबंदी लागू झाल्यानंतर जिल्हयालगतच्या पाचही जिल्हयांच्या सीमा बंद केल्या आहेत. २८ ठिकाणी नाकाबंदी केली असून मुख्यालयाचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही अनेक भागांमध्ये तैनात केला आहे. संचारबंदीची काटेकोर अमलबजावणीसाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्हीद्वारेही निगराणी ठेवण्यात येत आहे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण