जव्हार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी जव्हार येथील पर्यटनस्थळांना भेट देणार असल्याने नगरपरिषदेची तारांबळ उडाली. ऐतिहासिक जुना राजवाडा येथील बायपास राेडवरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याचे समजताच डम्पिंग ग्राउंड आणि रस्त्यावरील घाण दिसू नये म्हणून पडदा लावून ते झाकले हाेते. जव्हारचा सनसेट पॉइंट पर्यटनस्थळ म्हणून प्रचलित आहे. त्याला लागूनच जव्हारचा इतिहास असलेला जुना राजवाडा आहे. सनसेट पॉईटसमोरच डम्पिंग ग्राउंड असून हजारो मेट्रिक टन घनकचरा या भागात दररोज टाकला जातो. मात्र, त्याची वेळेवर विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे घनकचरा रस्त्यावर येतो. परिणामी, नागरिकांना उग्र वास सहन करावा लागतो. मात्र, मुख्यमंत्र्यांची धास्ती घेत नगरपरिषद प्रशासनाने रस्त्यावरील कचरा साफ केला आणि भला मोठा पडदा लावून डम्पिंग लपवण्याचा प्रयत्न केला. घनकचऱ्याची विल्हेवाट लावली असती, तर ही वेळ ओढवली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर डम्पिंग ग्राउंडला पडदा; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 1:51 AM