ठाणे : दिवाळी आधीचा शेवटचा सुट्टीचा दिवस आल्याने त्याचाच मुहूर्त साधत ठाणे, डोंबिवली, कल्याणसह सर्व प्रमुख शहरांत ग्राहकांनी सहकुटुंब खरेदीसाठी रविवारी एकच गर्दी केली. बाजारपेठांत इतकी गर्दी झाली होती की चालायलाही जागा नव्हती. रस्ते हाऊसफुल्ल झाले होते. दसऱ्यापेक्षा अधिक उत्साह पाहायला मिळाला. दुकानदारांनीही रोषणाई, रांगोळ्या काढत ग्राहकांचे स्वागत केले.दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आल्याने गर्दीने बाजारपेठा ओसंडून वाहात होत्या. कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तू, साहित्य खरेदीसाठी गर्दीच गर्दी झाली होती. त्यासोबतच अन्नधान्य, दिवाळीच्या फराळासाठीचा किराणा, सुकामेवा, व इतर सर्वच वस्तुंच्या खरेदीसाठी गर्दीने उच्चांक गाठला होता. पणत्या, कपडे, दिवाळीचे दिवे, आकाशकंदील खरेदीसाठीही तेजीत होती. ठाण्यातील गोखले रोड, राम मारूती रोड, डोंबिवलीतील स्टेशन परिसर, फडके रोड, कल्याणची बाजारपेठ, आग्रा रोड माणसासंह वाहनांनी भरून गेला होता. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस दिसत होते. रविवारीही पोलीस यंत्रणा सज्ज होती. येत्या दोन दिवसांत बाजारपेठेत आणखी गर्दी होईल, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. रविवारी सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी सुरू झाली, ती रात्री उशिरापर्यंत कायम होती. मिठाई, रेडीमेड फराळांची आॅर्डर, परदेशी फराळाचे बुकींग, रेडीमेड कपडे, दिवाळीत द्यायच्या भेटवस्तू, चॉकलेट, पाडवा-भाऊबीजेची खरेदी यासाठी झुंबड उडाली होती. घर सजवण्यासाठीच्या वस्तुही मुबलक खरेदी केल्या जात होत्या. महिन्याचे शेवटचे दिवस असले तरी अनेक कार्यालयांत पुढच्या महिन्याचा पगार हाती पडल्याने, बोनस मिळाल्याने आखडता हात न घेता खरेदी सुरू असल्याचे दिसत होते. (प्रतिनिधी)उल्हासनगर : दिवाळीनिमित्ताने फर्निचर, जपानी, गजानन, इलेक्ट्रॉनिक्स, बॅग, जीन्स व गाऊन मार्केटमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. मोठ्या संख्येने वाहने येत असल्याने कोंडी निर्माण झाली असून पोलिसांनी मार्केट परिसरात पार्किंगला मनाई केली आहे. खरेदीविक्रीतून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. तयार कपड्यांसाठी गजानन व जपानी मार्केट प्रसिद्ध असून जीन्स मार्केट देशात प्रसिद्ध आहे. मुंबई, पुणे, ठाणे ग्रामीण परिसर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड परिसरांतून ग्राहक खरेदीसाठी येतात. मात्र, पार्किंगची व्यवस्था शहरात नसल्याने वाटेल तशी वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी, शहरात वाहतूककोंडी निर्माण झाली असून मार्केटमधून चालण्यासाठीही नागरिकांना जागा राहिलेली नाही. चिनी फटाके कुठेच मिळत नसले तरी शहरातील विविध दुकानांत ते उपलब्ध आहेत. सरकारने मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालून विक्रीस निर्बंध घातले आहेत. मात्र, उल्हासनगरमध्ये सर्रास विक्री केली जात आहे. जपानी व गजानन मार्केटमध्ये दुकानदारांनी दोन जीन्स पॅण्टवर एक मोफत तसेच टी-शर्टवरही अशीच आॅफर ठेवली आहे. एक हजारापेक्षा जास्त खरेदी केल्यास १० ते २० टक्के सूट देण्यात येत आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वत्र ग्राहकांची झुंबड
By admin | Published: October 24, 2016 2:19 AM