उल्हासनगर : कॅम्प नं. ४ येथील महापालिका कोविड रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा करणारा पाइप अनाेळखी व्यक्तीने कापल्याची घटना १७ जुलैला रात्री घडली. पहिल्या मजल्याच्या वॉर्डात रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी उशिराने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्याने आरोग्य सुविधेसाठी शासनाच्या मध्यवर्ती व शासकीय प्रसूतिगृह रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. कोरोना काळात महापालिकेने कॅम्प नं. ४ येथील शासकीय प्रसूतिगृह रुग्णालय ताब्यात घेऊन रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. रुग्णालयात एकून ६० बेडपैकी दोन बेड व्हेंटिलेटर, तर इतर ऑक्सिजन बेड आहेत. सध्या शहरात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली आहे. रुग्णालयात जास्तीत जास्त ४ ते ५ रुग्ण असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली. १७ जुलैला रात्री पहिल्या मजल्यावरील वॉर्डला ऑक्सिजन पुरवठा करणारा तांब्याचा पाइप काेणी तरी कापून टाकला. पाइप कापल्याने रुग्णालयाचे नुकसान झाले आहे.
सर्वांकडून निषेध
महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांना हा प्रकार समजल्यावर धक्का बसला. या खोडसाळ वृत्तीचा त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यांच्या आदेशानुसार अखेर रुग्णालयातील कर्मचारी जितेंद्र माळवे यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी अनाेळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारचा सर्वस्तरांतून निषेध व्यक्त होत आहे.