ठाणे : फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला होत नाही. तोच त्याच्या दुसऱ्याच दिवशी फेरीवाल्यांबरोबर केप कापून आपला वाढदिवस साजरा ठाणे महापलिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील विवेक महाडीक या लिपिकाला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्यावर महापलिका प्रशासनाने शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई केली आहे.
माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सांयकाळी जीवघेणा हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली. तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकाचेही एक बोट कापले गेले. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईची कुऱ्हाड उगारली गेली आहे. त्यानुसार शहराच्या विविध भागात रस्ते, फुटपाथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली आहे. परंतु फेरीवाल्यांच्या विरोधात ही कारवाई सुरु असताना नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील विवेक महाडीक या लिपिकाचा फेरीवाल्यांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा फोटो सोशल मिडियावर वायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून संबधित लिपिकावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई केली आहे.