अजित मांडके,ठाणे : घोडबंदर भागातील कावेसर भागात एका विकासकाने आपल्या विकास प्रकल्पासाठी चक्क शेकडो वृक्षांची कत्तल केली असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर सोमवारी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी या भागात हेरीटेज जातीच्या वृक्षांची देखील कत्तल करण्यात आल्याच दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे संबधींत विकासकाला सीसी दिली असेल तर ती रद्द करावी दिली नसेल तर देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी या संदर्भात थेट पोलीस आयुक्तांकडे पत्रव्यवहार करुन कारवाईची मागणी केली आहे.
घोडबंदर भागातील कावेसर भागात एका विकासकाकडून बेकायदा वृक्ष तोड केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या बाबतीत आता वृक्ष प्रेमी देखील आक्रमक झाले आहेत. तावडे यांनी या संदर्भात पोलीस आयुक्तांकडे निवेदन देत संबधींत विकासकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हे दाखल झाले नाही तर न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान दुसरीकडे सोमवारी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील या भागाची पाहणी केली असून याठिकाणी ४ टक्के ते ५ टक्के वृक्षांची कत्तल झाली असावी असा दावा करीत हेरीटेज वृक्षही तोडले गेले असून त्याला परवानगी कोणी दिली असा सवाल उपस्थित केला आहे. पोलीसांनी आपली भुमिका स्पष्ट केली असून पालिकेकडून आता पंचनामा केला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. परंतु विकासकाला सीसी देण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.