लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने सायबर लुटारुंच्या फसवणुकीचे बळी ठरलेल्या ५ जणांना त्यांच्या फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिली आहे .
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर , सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल वाव्हळ , उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर सह मिलाग्रीस फर्नांडिस , सावन शेवाळे , सुवर्णा माळी , राहुल बन, विलास खाटीक , शुभम कांबळे, माधुरी धिंडे , पल्लवी निकम, प्रवीण सावंत, राजेश भरकडे यांच्या पथकाने सदर गुन्ह्यांचा तपास करत पैसे परत मिळवून दिले .
कालसी यांना मोबाईल वर अनोळखी व्यक्ती कडून लिंक आली होती . ती लिंक त्यांनी क्लिक केली असता त्यांच्या क्रेडिट कार्ड च्या खात्यातून ३ लाख २५ हजार रुपये गेले . त्या पैकी १ लाख ७१ हजार ९७० रुपये सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले . दत्तानी व्यक्तीचे अमेरिकन एअरलाईन्सच्या ट्रॅव्हलचे लॉगिन आयडी घेऊन त्याद्वारे त्यांची १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती . सायबर शाखेने फसवणुकीची सर्व १ लाख २५ हजारांची रक्कम परत मिळवून दिली
त्रिवेदी नावाच्या महिलेस अनोळखी कॉल करून तुमच्या खात्यात चुकून पैसे गेल्याचे सांगून व ती रक्कम परत करा असे सांगितले . त्यात त्रिवेदी यांची २२ हजार ४९३ रुपये ची फसवणूक केली होती. ती सर्व रक्कम पोलिसांनी पुन्हा मिळवून दिली. मेहता - झा नावाच्या महिलेने टेलिग्राम चॅनल वर ऑनलाईन पार्ट टाइम जॉब ची जाहिरात पहिली. त्यात हॉटेल ना ऑनलाईन रेटिंग देण्यासाठीचे काम होते . त्यासाठी टास्क विकत घ्यावे लागतील सांगितले आणि त्यांची काही लाख रुपयांना फसवणूक केली गेली. सायबर पोलिसांनी त्या पैकी ७ लाख ५० हजार परत मिळवून दिले .
तन्वर नावाच्या व्यक्तीला मोबाईल वर मॅसेज करून क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी लिंक पाठवण्यात आली . तन्वर यांनी लिंक क्लिक करून माहिती भरल्या नंतर त्यांच्या क्रेडिट कार्ड मधून ४७ हजार रुपये काढले गेले . ती सर्व रक्कम पोलिसांनी परत मिळवून दिली .