मीरारोड - अनोळखी व्यक्ती असून देखील पैश्यांच्या आमिषाला बळी पडून फसगत झालेल्या दोघांना त्यांच्या फसवणुकीची ११ लाख ५४ हजार रुपयांची रक्कम सायबर पोलीस ठाण्याने परत मिळवून दिली.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणारे गुप्ता नावाच्या इसमाने दुप्पट रक्कम मिळते अशी जाहिरात पाहून पैश्याच्या लोभाने टेलिग्राम वरील अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट ऍप मध्ये ११ लाख १४ हजार रुपयांची ऑनलाईन गुंतवणुक केली होती. परंतु दुप्पट रक्कम मिळाली नाहीच शिवाय मुद्दल सुद्धा हातची गेल्याने फसगत झालेल्या गुप्ता यांनी वळीव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तर नालासोपारा पोलीस ठाणेचे हद्दीतील रावत यांनी पंजाब नॅशनल बँकेचे क्रेडीट कार्डकरीता अप्लाय केले होते. त्यांना क्रेडिट कार्ड प्राप्त झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेतुन बोलत असल्याचा कॉल आला . अनोळखी इसमाच्या सांगण्यावरून रावत यांनी त्याला क्रेडिट कार्डची माहिती दिली . त्या द्वारे सायबर लुटारूंनी रावत यांची ४४ लाख ७०० रुपयांची फसवणूक केली होती.
या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुजितकुमार गुंजकर व पथकाने चालवला होता . पोलिसांनी दोघांची रक्कम ज्या वेगवेगळ्या बँक खात्यात गेली होती तेथील माहिती घेऊन ती रक्कम गोठवली. नंतर न्यायालयातून आदेश प्राप्त करून घेत फसवणुकीची रक्कम फसवणूक झालेल्या तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.