अंबरनाथ : मागील १० वर्षांपासून विश्वशांतीसाठी चक्क सायकलने प्रवास करून आपल्या देशाची प्रतिमा अधिकच उजळली आहे. श्रीलंका, पाकिस्तान, चीन, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, बांगलादेशासोबत संपूर्ण भारतभ्रमण करणारे अंबरनाथमधील मनोहर कदम यांनी शनिवारी अंबरनाथ ते बंगळुरू-उटी असा साधारण दोन हजार किलोमीटरच्या प्रवासाला सुरु वात केली आहे.
सायकलवर तिरंगा आणि अंगावर शुभ्र कपडे असा पोशाख परिधान करून दिवसाला १०० किलोमीटरचा प्रवास ते करतात. अनेकदा त्यांना जंगलातही राहण्याची वेळ आली, मात्र आत्मविश्वास व देशभक्तीमुळे ते कधी डगमगले नाहीत की, कधी आजारीही पडले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत शरीरात प्राण आहेत, तोपर्यंत विश्वशांतीसाठी सायकल प्रवास करत राहणार, असे कदम यांनी सांगितले.प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत असताना विश्वशांतीच्या संदेशाने झपाटलेल्या कदम यांना आपल्या कुटुंबाचीही साथ मिळत असल्याने त्यांचा प्रवास सुखकर होतो. वयाची सत्तरी गाठलेली असतानाही आपल्या आरोग्याची पर्वा न करता त्यांनी शनिवारी पुन्हा आपल्या सायकलस्वारीला सुरुवात केली आहे. बंगळुरू-उटी असा दोन हजार किलोमीटरचा हा प्रवास दोन महिन्यांत ते पूर्ण करणार आहेत. संघटनांनी कदम यांना मदतीचा हात दिला आहे.