ठाणे – निसर्ग चक्रीवादळाचं संकट मुंबईवरुन टळलं असलं तरी या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेचे चक्रीवादळात प्रचंड नुकसान झाल्याचं चित्र दिसून आलं.
याठिकाणी वेगवान वाऱ्याने शाळेचे पत्रे उडाले, वर्ग खोल्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने मोठे नुकसान झाले. ठाणे जिल्हयात निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी धडकल्यानंतर पावसानेही काही प्रमाणात हजेरी लावली. नवी मुंबईपासून सुरुवात झालेल्या या वादळाने जिल्हाभर दोन ते तीन तासांची हजेरी लावली.
या काळात ठाणे शहरासह भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी भागांमध्ये ७० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. तर १० ते १२ घरांचे नुकसान झाले. या वादळापासून बचाव होण्यासाठी खाडी तसेच नदीकिनारी असलेल्या तीन हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते.
खबरदारीची उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सर्व ग्रामविस्तार अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती. बुधवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात दवंडी पिटवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. ठाणे महापालिकेनेही एनडीआरफची एक टीम तैनात ठेवली होती. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरु असून खबरदारी म्हणून महावितरणने विज पुरवठा खंडित केला होता.