ठाणे : खारेगाव भागातील भूमिपुत्र मैदानात पुन्हा सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरला तौत्के चक्रीवादळाचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. हे सेंटर मैदानात असल्याने पावसाचा फटका याला बसला आहे. त्यामुळे येथील २२ रुग्णांना अखेर दुपार नंतर महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरला हलविण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली.
ठाण्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्ण कमी होत आहेत. परंतु मधल्या काळात कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात वाढतांना दिसत होते. कळवा, खारेगाव या भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. परंतु येथील रुग्णाना उपचारासाठी थेट ठाण्याच्या दिशेने यावे लागत होते. ग्लोबल किंवा पार्किंग प्लाझा येथे रुग्णांना दाखल करावे लागत होते. तसेच सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या नागरिकांना भाईंदरपाडा येथे महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात ठेवले जात होते. त्यामुळे कळव्यात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांसह इतरांनी केली होती. त्यानुसार मागील आठवडय़ात हे सेंटर पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले होते.
(Cyclone Tauktae : ठाण्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पडझड, जनजीवन विस्कळीत)
याठिकाणी केवळ सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात होते. त्याठिकाणी २२ रुग्ण सध्या उपचारासाठी दाखल होते. दरम्यान, तौत्के चक्रीवादळाचा फटका देखील या कोविड सेंटरला बसल्याची माहिती समोर आली आहे. मैदानातच हे कोविड सेंटर तात्पुरत्या म्हणजे टेंट स्वरुपात उभारण्यात आले आहे. परंतु सोमवारी झालेल्या पावसाने या सेंटरमध्ये पाणी येऊ लागल्याने अखरे सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून येथील सर्वच म्हणजे २२ रुग्णांना तातडीने महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.