मुंब्रा : ‘पापा, आप जहाँ है वही रहिये. गाँव मत आईये. आप अगर गाँव आएंगे तो हमारे सारे परिवार को घर छोडके गाँव के बाहर रहना पडेगा...’ मुलाचे हे उद्गार शोएब अन्सारी यांच्या कानांत शिशाच्या गरम रसासारखे ओतले गेले. सध्या बेरोजगार झालेल्या शोएबला उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी जायचे होते. श्रमिक एक्स्प्रेसचे तिकीट न मिळाल्याने एका ट्रकमधून जाण्याचे त्याने ठरवले होते. मात्र, मुलाचे हे उद्गार ऐकल्यावर त्याने गावी जाण्याचा बेत रहित केला.
लॉकडाउनमुळे मूळ गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या काही श्रमिकांच्या कुटुंबांतील सदस्यांनी आपल्या रक्ताच्या नात्यातील मंडळींना गावी येण्यापासून रोखले. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांतील मजूर मुंबईत काम करतात. मात्र, ते जर गावी आले तर कोरोनाचा फैलाव वाढेल, या भीतीने त्यांच्या मूळ राज्यांमधील गावांतील लोकप्रतिनिधींनी त्यांना गावात प्रवेश करू न देण्याबाबत फतवे काढले आहेत.
काही गावांनी मुंबई किंवा अन्य राज्यांतून आलेल्या व्यक्तीला घरात प्रवेश दिला, तर संपूर्ण कुटुंबाला गावाबाहेरील क्वारंटाइन कक्षात राहण्याची सक्ती केली आहे, तर गावांनी बाहेरील व्यक्तींना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. मी गावी जाण्यासाठी इच्छुक होतो. परंतु, मुलाने फोनवर जे सांगितले, त्यामुळे मला मानसिक धक्का बसला. कितीतरी वेळ माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.अन्सारी हा नाका कामगार आहे.
बेरोजगारीमुळे मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत होता. श्रमिकांच्या ट्रेनमधून जाण्यासाठी त्याने प्रयत्न केले. परंतु, प्रतीक्षा यादी बघून तो अवाक झाला. त्यानंतर, त्याने ट्रकमधून गावी जाण्याची तजवीज केली. चार दिवस आधी त्याने मुलाला फोन करून गावी येत असल्याचे सांगितले. मात्र, त्याची निराशा झाली. ज्यांच्यासाठी येथे मेहनत करतो, त्यांच्या मनात असलेली ही भावना उद्विग्न करणारी असल्याचे तो म्हणाला.
बिहारमध्येही अशीच परिस्थिती
काहीशी अशीच व्यथा महंमद अस्लम शेख याची आहे. तो बिहारचा असून त्याच्या गावाने बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे. आमच्या गावातील लोकांनाच आम्ही तिकडे येऊ नये, असे वाटत असेल, तर आम्ही कुठे जायचे, असा आर्त सवाल त्याने केला.