ठाणे : आधीच ठाणे महापालिका हद्दीत कमी-जास्त प्रमाणात लस उपलब्ध होत आहेत. परंतु, आपल्या प्रभागातील नागरिकांना लस मिळवून देण्यासाठी सध्या राजकीय चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी ग्लोबल रुग्णालयात दिसून आला. रांगेत असलेल्या नागरिकांना डावलून मी नगरसेवक आहे, आधी माझ्या माणसांना लस द्या, असा दम देऊन लसीकरण करून घेणाऱ्या भाजपच्या मृणाल पेंडसे या नगरसेविकेमुळे येथे चांगलाच राडा झाला. त्यांच्या दादागिरीविरोधात रांगेतील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी येथील स्टाफ नर्सेसलादेखील धमकी दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. मात्र, चुकीच्या पद्धतीने लसीकरण सुरू असल्याने त्याला विरोध केल्यानेच हे आरोप केल्याचा दावा पेंडसे यांनी केला.
ग्लोबल कोविड सेंटरमध्ये रोजच्या रोज एक हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. परंतु, शुक्रवारी दुपारी पेंडसे या २०० जणांना त्या ठिकाणी घेऊन आल्या. यामध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक होते. मी नगरसेविका आहे, आधी माझ्या माणसांचे लसीकरण करा, नंतर इतरांचे करा, अशी मागणी त्यांनी केली. परंतु सकाळपासून रांगेत असलेल्या नागरिकांचे आधी लसीकरण केले जाईल, नंतर इतरांचे करू, असे प्रशासनाने सांगितले. यावरून त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी येथील स्टाफला दमदाटी करून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेन, अशी दमबाजी केल्याचा दावा येथील स्टाफ नर्सेसने केला आहे.
डॉ. माळगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी २०० ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाला घेऊन गेले होते. परंतु, तेथे चुकीच्या पद्धतीने व्हीआयपी रूममध्ये लसीकरण सुरू असल्याने ही बाब उघड केल्यानेच स्टाफ आणि माझ्यामध्ये वाद झाला. मी जर वाद घातला असेल तर माझी वरिष्ठांकडे तक्रार करणे अपेक्षित होते. परंतु, स्टाफने लसीकरण थांबविणे चुकीचे आहे. त्यानंतर उशिरापर्यंत आम्ही थांबलो, रात्री ८.३० पर्यंत लसीकरण सुरू होते.- मृणाल पेंडसे, भाजप नगरसेविका
यापूर्वी येथे कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ झाला नाही, येथील स्टाफकडून योग्य पद्धतीने लसीकरण केले जात आहे. ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील नागरिक, उन्हातान्हात बसतात, परंतु, अशा सर्वांना डावलून हा आधी लस घेण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे. केंद्रावर शिवीगाळ केली, नोकऱ्या घालवू, अशी धमकी देणेदेखील अतिशय चुकीचे आहे. यामुळे संबंधित नगरसेविकेवर व त्यांच्या समवेतील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पुन्हा असा प्रकार घडला तर त्यांना त्यांच्या पद्धतीनेच उत्तर दिले जाईल.- संजय भोईर, स्थायी समिती सभापती