कोेळसेवाडी : कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावरील तयार झालेल्या प्रेक्षागृहावरील छप्पर कधी बसणार, अशी मागणी कोळसेवाडीतील क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे.ज्येष्ठ कबड्डीपटू नित्या हरी डे म्हणाले की, कोळसेवाडीतील कबड्डीची जन्मभूमी समजल्या जाणाऱ्या या चार हजार चौरस फुटांच्या मैदानावर ३५ वर्षांपासून कबड्डी खेळताना लाल माती अंगावर झेलत आहे. तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील सामन्यांचे आयोजन झाले आहे. प्रत्येक वेळेस तात्पुरती प्रेक्षक गॅलरी बांधावी लागते. त्यामुळे होणारा खर्च टाळण्यासाठी संयोजकांकडून प्रेक्षक गॅलरीची मागणी होवू लागली. परंतु, गॅलरीच्या बांधकामामुळे मैदानाची दुर्दशा झाली आहे.आ. गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने २०१४ साली विशेष विकास निधीतून मैदानाच्या पश्चिमेकडे सिमेंटची गॅलरी बांधण्यात आली.गॅलरीच्या बांधकामाशी संबंधित शरद पाटील म्हणाले की, प्रेक्षागृहाच्या मागे महिला पुरु ष कबड्डी स्पर्धकांसाठी वेगवेगळे कक्ष बांधले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधनगृह व शौचालयाची व्यवस्था आहे. प्रेक्षागृहावर पत्रे टाकण्याचा ठराव मंजूर झाला आहे. २५ लाखांचे बिल पेंडींग आहे. त्याच दरम्यान दुसरे प्रेक्षागृह समोरच्या जागेत बांधण्यास प्रशासनाने सुरवात केली. आ. गायकवाड यांनी सांगितले की, दोन्ही प्रेक्षक गॅलरीसाठी निधी मंजूर झाला होता. त्याप्रमाणे बांधकाम सुरु झाले. परंतु त्याच वेळेस क्रीडाप्रेमींकडून दुसºया प्रेक्षक गॅलरीला विरोध होऊ लागला. आ. जगन्नाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. मंत्री पातळीवर निर्णय होवून प्रेक्षागृहाचे अर्धवट झालेले बांधकाम महापालिकेने जमीनदोस्त केले. नागरिकांनी महापालिकेच्या धरसोड वृत्तीबद्दल टीकेची झोड उठवली. ठेकेदाराचे झालेले नुकसान कोण भरु न देणार असा प्रश्न आजही चर्चेत आहे.या संदर्भात कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्याशी संपर्क झाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, निधीची कमतरता असल्यामुळे छपराचे काम झालेले नाही. मात्र आ. गायकवाड यांच्या मते दोन्ही प्रेक्षागृहांसाठी पुरेसा निधी मंजूर करु नही निधी अपुरा पडत असेल तर ते प्रशासनाच्या दिवाळखोरीचे लक्षण आहे.
दादासाहेब गायकवाड क्रीडांगणाचे प्रेक्षागृह छपराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:30 PM