मीरा रोड : बंदी असलेल्या तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे नाव छापलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सुरू असतानाच गुजरात आणि दादरा-नगर-हवेलीचा पत्ता असलेल्या प्लास्टिक पिशव्यादेखील विकल्या जात असल्याचे उघड झाले आहे. एकीकडे प्लास्टिकबंदी करायची आणि दुसरीकडे सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री करायची, असा प्रशासनाचा दुटप्पी कारभार सुरू आहे.
बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास सुरू असलेला वापर आणि होणारी थातूरमातूर कारवाई ‘लोकमत’ने सातत्याने चव्हाट्यावर आणली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उल्लेख असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात विक्री तसेच वापर होत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यातच, आता गुजरात आणि दादरा आणि नगर हवेलीचा पत्ता असलेल्या पातळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर तसेच विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्यात बंदी असताना या पिशव्या बाहेरून चोरट्या मार्गाने आणून विकल्या जात आहेत.लहान प्लास्टिक पिशव्याविक्रेते या बंदी असलेल्या पिशव्या विकत असल्याचे आढळले आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी सुवर्णा गायकवाड यांनीदेखील भार्इंदर येथील कारवाईदरम्यान प्लास्टिक पिशव्या बेकायदा असल्याचे स्पष्ट केले होते.उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी साठा जप्त न केल्याने टीकेची झोड उठताच पालिकेने भार्इंदर पूर्व भागातील दुकानांमधून तब्बल १८०० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला होता. भार्इंदरमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई होत असताना मीरा रोडमध्ये मात्र सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर सुरू आहे. यामुळे येथील स्वच्छता निरीक्षक, मुकादम आदी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.गुजरात, दादरा नगर हवेली येथील उत्पादकांच्या प्लास्टिक पिशव्या कारवाईदरम्यान सापडल्या आहेत. याबाबत वरिष्ठांना कळवू. प्लास्टिक पिशव्यांविरोधातील कार्यवाही सुरू आहे.- प्रकाश पवार, स्वच्छता निरीक्षकविक्रेते तसेच वापरकर्त्यांवर कारवाईची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाची आहे. मंडळाने कोणालाही प्लास्टिक पिशव्या बनवण्यास परवानगी दिलेली नाही.- सुवर्णा गायकवाड, नियंत्रण अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ