डहाणू : देशा-परदेशातील पर्यटकांची डहाणू आणि परीसरातील समुद्रकिनाऱ्याला नेहमीच पसंती राहीली आहे. त्यामुळे थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनसाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे, पुणे तसेच गुजरात राज्यातील हजारो पर्यटकांनी येथील रिसोर्ट, हॉटेल, फार्महाऊस तसेच नारळी पोफळीच्या वाड्यांमधील कुट्याही हाऊसफुल्ल केले आहेत. विशेष म्हणजे २४, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस, ईद-ए-मिलाद बरोबरच चौथा शनिवार, रविवार अशा लागोपाठ चार सुट्ट्या येत असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ येणार असल्याने येथील हॉटेल व्यावसायिकांबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे.निसर्ग संपन्नतेने नटलेला डहाण्ूाचा समुद्रकिनारा मिनी गोवा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. सध्याच्या प्रदुषणयुक्त वातावरणात सर्वांना आल्हाद देतो तो केवळ निसर्ग, त्याच्या सानिध्यात राहायला अबाल वुद्धांपासून सर्वानाच आवडते. देशी-विदेशी पर्यटक हिवाळा असो की उन्हाळा, त्याचा आनंद घेण्यासाठी नानाविध ठिकाणच्या पर्यटनस्थळी फुरसतीनुसार कुटुंबियांसह धाव घेत असतात. अशाच प्रकारचे पर्यटकांना आकर्षित करणारे स्थळ म्हणजे डहाणू. निसर्गरम्य ग्रामीण भागातील पश्चिमेकडील चिंचणी ते झाई पर्यंतचा समुद्रकिनारा, गर्द झाडी, नारळपोफळीची बने, सुरूची मोठमोठी बने, अधुनमधून आपली झलक दाखविणारी पाखरे फुलपाखरे आणि याच किनाऱ्यावर वसलेली शाळा, महाविद्यालय, किल्ले, तसेच मोठमोठी सुंदर मंदिरे यांच्या सानिध्याची रंगत वाढविणारा फेसाळ समुद्र तसेच रुपेरी वाळू सर्वांनाच आकर्षित करणारा आहे. (वार्ताहर)
थर्टी फर्स्टसाठी डहाणूला पसंती
By admin | Published: December 22, 2015 12:12 AM