कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने (केडीएमटी) कंत्राटदारामार्फत चालक तसेच बसची वार्षिक देखभाल-दुरुस्ती (एएमसी) सुरू केली आहे. त्यामुळे बसच्या ब्रेकडाउनचे प्रमाण कमी झाल्याने सध्या दररोज ८० बस रस्त्यावर धावत आहेत. भिवंडी आणि पनवेल मार्गावर या जादा बस चालवल्या जात असल्याने केडीएमटीचे दैनंदिन उत्पन्न साडेपाच लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
केडीएमटीकडे २१८ बस आहे. परंतु, वाहक आणि चालकांअभावी ५० ते ५५ बसमार्गांवर धावत होत्या. आउटसोर्सिंगद्वारे ८० वाहकांची भरती करण्यासाठी वारंवार निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने मोजक्याच बसचे संचलन सुरू होते. १० व्होल्वो, जेएनएनयूआरएमअंतर्गत १०८ बस व अन्य अशा १३८ बस चालवण्याचे उपक्रमाचे नियोजन आहे. त्याकरिता बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी एएमसी दिली आहे. कंत्राटदाराचे चालक आणि स्वत:चे वाहक यांच्या माध्यमातून बसमार्गावर चालवण्याचे उद्दिष्ट उपक्रमाने ठेवले.
सध्या कंत्राटदाराला १२८ बस देखभाल-दुरुस्तीसाठी दिल्या आहेत. त्यामुळे सध्या ८० बस रस्त्यावर धावत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहकांची निविदा मंजूर झाल्यास जूनअखेरपर्यंत १०० बस चालवण्याचे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
कल्याण-भिवंडी मार्गावर दोन दिवसांपासून सकाळ आणि दुपारी प्रत्येकी १० बस चालवल्या जात आहेत. पूर्वी या मार्गावर प्रत्येक सत्रात पाच बस धावत होत्या. या बसच्या २० फेऱ्यांच्या माध्यमातून दैनंदिन ३५ ते ४० हजारांचे उत्पन्न मिळत होते. पण, आता दुरुस्ती तसेच प्रवाशांकडून होत असलेल्या मागणीनुसार दोन्ही सत्रांत प्रत्येकी १० बस चालवल्या जात असल्याने प्रवासीसंख्येत वाढ होऊन या उत्पन्नातही वाढ होणार आहे.पनवेल मार्गावरही दोन्ही सत्रांत प्रत्येकी १५ बस चालवल्या जात आहेत. पूर्वी प्रत्येकी आठ बस धावत असत. आता दिवसभरात ६० फेऱ्या होत आहेत. त्यामुळे अर्ध्या तासाऐवजी दर १५ मिनिटांनी बस सुटत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासीसंख्येतही वाढ झाली आहे.
पनवेलपाठोपाठ कल्याण-भिवंडी मार्गावरही जादा बस चालवल्या जात आहेत. जूनअखेरपर्यंत उपक्रमाच्या १०० बस रस्त्यावर धावतील, हे उद्दिष्ट आम्ही आता ठेवले आहे. लांब पल्ल्यांसह कल्याण-डोंबिवलीअंतर्गत मार्गावर बससुविधा सक्षमपणे देण्याचे आमचे नियोजन आहे. - मारुती खोडके, व्यवस्थापक केडीएमटी