शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आठवे वार्षिक आधिवेशन रिलायन्स सभागृहात पार पडले . त्यास ५५० सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय पतंगे, पालघर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे अध्यक्ष विनायक शेळके व डहाणू तालुका सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. संघाच्या सभासदापैकी ज्या सभासदांना ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत, अशा सभासदांचा मानवस्त्र, श्रीफळ देऊन पतंगेच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त संघासाठी भरीव कार्य करणाऱ्या शैलजा पाटील, हरिश्चंद्र चुरी, कमलाकर केणी, मुरलीधर माच्छी, मारूती वाघमारे यांना स्मृतीचिन्ह, मानवस्त्र, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. अधिवेशनाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत सचिव बापूराव देवकर व हेमंत राऊत यांनी केले. संजय पतंगे यांनी सांगितले की, जिल्हाभरातील सेवानिवृत्तात ८० टक्के शिक्षक आहेत. त्यासाठी संघाने शिक्षण विभागाबरोबर सतत संपर्क ठेवून त्रुटी दूर केल्यास सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ मिळण्यासाठी विलंब लागणार नाही. याकरीता कर्मचारी सेवानिवृत्त होण्याच्या तीन महिने आधीपासून संघाने कागदपत्रे परीपूर्ण करून जिल्हा कार्यालयाला सादर केली पाहीजेत म्हणजे माझ्या अर्थ विभागातून त्यास लवकर मंजुरी मिळून निवृत्ती वेतन, विक्री इ. लाभ सेवानिवृत्तीच्या दिवशी देता येणे शक्य होईल.अधिवेशन अध्यक्ष मारूती वाघमारे यांनी संघात १४७३ सभासद असल्याचे सांगितले. संघाचे नवीन कार्यालय डहाणू रेल्वे स्टेशन लगत असावे असा प्रस्ताव माडून सभासदांना सढळ हाताने मदतीचा हात पुढे करण्यासाठी आवाहन केले. सुमारे पाच तास चाललेल्या या अधिवेशनाचे सूत्रसंचलन शैलेश राऊत व अर्चना पाटील यांनी केले. तर आभार हेमंत राऊत यांनी मानले स्नेह भोजनानंतर अधिवेशनाची सांगता झाली.
सेवानिवृत्तांचे डहाणूत वार्षिक अधिवेशन
By admin | Published: May 23, 2017 1:23 AM