मीरारोड - मीरा भाईंदर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीत झालेल्या सततच्या तांत्रिक बिघाड व अडचणींमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर मात्र विपरीत परिणाम झाला आहे. जोरदार पावसामुळे धरणं भरली असताना पाणी मात्र कमी येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते.
शहराला महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. बारवी धरण भरून वाहू लागले असताना मीरा भाईंदर मध्ये मात्र पाणी पुरवठा कमी होत आहे. गेल्या काही दिवसात विविध कारणांनी पाणी पुरवठा अपुरा होत आहे . मुसळधार पावसामुळे कचरा अडकून पंप चॉकअप होणे, बंद पडणे, बिघडणे असे प्रकार घडले. दोन वेळा जलवाहिनी फुटली. दुरुस्तीसाठी चार तासांचा शटडाऊन घेतला तरी शहराला पाणी मिळण्यास ८ तास जातात. ते पाणी सुद्धा कमी दाबाने असते.
पाऊस जोरात असला कि वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा बंद पडतो. त्यातही मीरा भाईंदर हे टेल एन्ड ला असल्याने पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो पुन्हा सुरळीत होण्यास व पाण्याचे प्रेशर वाढण्यास एक - दोन दिवस तर सहज जातात . जेणे करून गेल्या काही दिवसां पासून पाणी कमी येत असल्याने नागरिकांना देखील पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.
महामंडळाकडून पाणी पुरवठा या विविध तांत्रिक अडचणी, बिघाड यामुळे अगदी ८० ते ८५ दशलक्ष लिटर वर आला होता स्टेमकडून ८६ दशलक्ष लिटर पाणी येत असले तरी तेथे देखील वीज गेली वा तांत्रिक बिघाड मुळे शटडाऊन घ्यावा लागला होता. परंतु महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा कमी झाल्याने त्याचा जास्त फटका नागरिकांना बसला. जेणेकरून शहरातील पाणी पुरवठा ४८ ते ६० तासांवर जाऊन पोहचला होता. आता त्यात सुधारणा झाली असून पुरवठा ३८ ते ४० तासांवर आला आहे असे सूत्रांनी सांगितले.