ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३८.७ मिमी. पाऊस पडला. याशिवाय बारवी धरणात ८७.७१ टक्के, तर भातसा धरणात ८८.१० टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.
शनिवारी ठाणे शहर परिसरात ४२ मिमी. पाऊस पडला. शहरात मल्हार सिनेमा जवळ एक झाड पार्क केलेल्या दोन गाड्यांवर झाड पडले. याप्रमाणेच कल्याणला ४५.५ मिमी पावसासह मुरबाडला ४३.४ मिमी, भिवंडीत ३२.५, शहापूर १६.५, उल्हासनगरमध्ये ४५ मिमी आणि अंबरनाथला ५४.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शहरांसह मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटात उत्तम पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे.
जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावीच्या खानिवरे या पाणलोटात ९८ मिमी, कान्होळला ७८ मिमी, पाटगांवला ३२ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात ६० मिमी, तर खुद्द बारवी धरणात सरासरी १० मिमी पाऊस पडला आहे. याप्रमाणेच आंध्रा धरणात ६७.५३ टक्के पाणीसाठा झाला आहे.