लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. यात आतापर्यंत सहा जणांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जिल्ह्यातील ६३९.६० हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये भातपिकांसह फळबागा आणि शेतजमीन वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हाभरात साडेपाच हजार रहिवाशांना शाळा, समाजमंदिर, सभागृह आदी ठिकाणच्या सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा अजून झालेला नाही. नदी, नाल्यांना आलेला पूर आणि त्यात खाडीला आलेल्या भरतीमुळे नदीच्या पुराचे पाणी खाडीत न गेल्यामुळे ते आहे त्या ठिकाणी साचले. त्यामुळे निवासी भागात पाणी शिरल्यामुळे ते दुकाने, घरांमध्ये घुसले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना काही काळ घराच्या छतावर, पत्र्यांवर राहावे लागले.
या दरम्यान जिल्ह्यात तैनात केलेल्या एनडीआरएफच्या जवानांसह टीडीआरएफच्या जवानांनी या निवासी भागातील आपत्तीग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४० हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्यामुळे शेतक-यांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात भातलागवडीची कामे सुरू आहेत. त्यासाठी वाढवलेली भातरोपेही वाहून गेली. भुसभुशीत शेतजमीनही वाहत्या पाण्यात वाहून गेली आहे. तर, काही ठिकाणच्या फळबागांमधील आंबा, फणस, काजू, सीताफळे आदींची फळझाडे उन्मळून पडली, तर काही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
------