ठाणे: गेल्या एक महिनाभरापासून सुरु असलेल्या सराफांच्या संपामध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे पाडव्याच्या आदल्या दिवशी सुवर्णकार संघटनेचे पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले. ज्यांची दुकाने गुरुवारी उघडी दिसली त्याठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी जाऊन हल्लाबोल केला. पाडव्याच्या दिवशी कोणी दुकान उघडे ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तोडफोडीचा इशारा दिल्यामुळे एकाच दिवसात शहरातील सुमारे ३०० सोन्या चांदीच्या विक्रेत्यांना किमान दहा कोटींच्या मुहूर्ताच्या धंद्यावर पाणी सोडावे लागणार आहे. ज्यांची आठ कोटींपेक्षा जास्त उलाढाल आहे, अशा विक्रेत्यांना अबकारी कर भरण्याची नवीन अट केंद्र सरकारने घातली आहे. याच कारणास्तव २ मार्चपासून ठाण्यासह राज्यभरातील सुवर्णकारांचा संप सुरु आहे. शुक्रवारी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुहूर्ताच्या सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवार आणि शुक्रवारी हा संप मोडीत काढून काही दुकानदार दुकाने सुरु ठेवतील, या शक्यतेने सराफांच्या संघटनेने शहरातील नौपाडा, टेंभी नाका आणि घोडबंदर रोडवर धडक दिली. टेंभी नाका येथील अनिल ज्वेलर्स हे दुकान काही प्रमाणात उघडे दिसल्यामुळे दुपारी १२ वा. च्या सुमारास या दुकानावर हल्लाबोल करण्यात आला. त्यावेळी आपण गिऱ्हाईकांची नाही तर पोलिसांची काही कामे करीत असल्याचे दुकानाचे मालक अनिल पंडीत यांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, काहीही झाले तरी दुकाने बंद ठेवा. अन्यथा, परिणामांना सामोरे जा, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांना दिला. अनिल ज्वेलर्स नंतर शहरातील टीबीझेड, वामन हरी पेठे, रांका तसेच पु. ना. गाडगीळ आदी दुकानांवरही हे पदाधिकारी धडकले होते. एका बड्या ज्वेलर्सने आम्ही सर्व कर भरीत असून बंदमध्ये सामील होण्याचा प्रश्नच नसल्याचे संबंधितांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
इशाऱ्यामुळे पाडव्यालाही सराफांचा बंद
By admin | Published: April 08, 2016 1:20 AM