ठाणे : शहरात झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. त्यातच नौपाडा परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक झाड उन्मळून बिल्डिंग आणि कारवर पडले. त्यामुळे बिल्डिंगच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रील आणि एका कारचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
नौपाड्याच्या गावंड पथ येथील अनिल बिल्डिंग आणि तेथे उभ्या केलेल्या कारवर रात्री दोन वाजून पाच मिनिटांनी अचानक एक झाड उन्मळून कोसळले. ते अनिल बिल्डिंगच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खिडकीच्या ग्रील आणि त्यानंतर कारवर पडले. झाड पडल्याची माहिती कळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने ते हटविण्यास सुरुवात केली. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. यावेळी एक फायर इंजीन आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण केले होते, अशी माहिती ठामपा आपत्ती कक्षाने दिली.