लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी रात्रभर झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तिघांच्या मृत्यूसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे तर ५६६ घरांचे कमीअधिक नुकसान झाले. २३८ हेक्टरवरील आंबा, काजू, भात आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊन गेल्या ४८ तासांत तब्बल १६४ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे.
चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी वेगाने वाहत होता. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या २४ तासांत सरासरी ५३ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सात शाळांचे काहीअंशी नुकसान होऊन सात घरांचे पूर्णपणे नुकसान झाले. ५५९ घरांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान होऊन त्यावरील पत्रे उडाले, काही घरांच्या भिंती पडल्या, तर काहींना तडे गेले आहेत. घरांच्या या नुकसानीचा फटका तब्बल एक हजार ३०० रहिवाशांना बसला आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी २२ विजेचे खांब पडले आहेत. यापैकी शहापूरला १५ व कल्याणला सात खांब पडले. याशिवाय ९४३ झाडे ठिकठिकाणी उन्मळून पडले आहेत. यामध्ये अंबरनाथला सर्वाधिक २९३ झाडांचा समावेश आहे. ठाण्यातील २७९ झाडं, मीरा भाईंदरमधील १२७, उल्हासनगरमधील १२२, कल्याणमधील ७६, भिवंडीतील २८ आणि शहापूरच्या १२ झाडांना चक्रीवादळाने उपटून काढले. या व्यतिरिक्त हजारो झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यादरम्यान तिघांच्या मृत्यूसह आठजण गंभीर जखमी झाले. यापैकी सहाजण ठाणे शहरातील असून, भिवंडी आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
--------