लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहापूर, मुरबाड या परिसरातील भेंडी, कारली, मूग, हरभरा, काकडी यासारख्या नगदी पिकांचे निलगाईंच्या चार ते पाच कळपांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेकडो एकरांवरील पिकांचे आतापर्यंत नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या भागातील भेंड्यांना जागतिक बाजारपेठेत स्थान आहे. या परिसरात समूह शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी यंदाही भेंडी, कारल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यासाठी काही कंपन्यांकडून त्यांनी कर्ज घेऊन बियाणे उपलब्ध केले आहे. शहापूर, मुरबाडच्या वेशीवरील किन्हवली परिसरातील जंगलात निलगाईंचे वास्तव्य आहे. तानसा, शेजारील रायगडमधील कर्नाळा अभयारण्यातून या निलगाई थेट शहापूर, मुरबाड तालुक्यातील शेतांमध्ये घुसून रब्बी पिके फस्त करीत आहेत. अगोदरच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना, निलगाईंकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे.
किन्हवलीच्या कानवा नदी काठावरील या शेतीवर ताव मारणाऱ्या निलगाईंनी भेंडी, कारली, मूग, हरभरा, काकडी, दुधी भोपळा तसेच पालेभाज्या फस्त केल्या आहेत. या परिसरात तब्बल चार ते पाच कळप मोकाट फिरत आहेत. एका कळपात किमान २५ ते ५० निलगाईंचा समावेश असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. फोफोडी, खरोड, कानवा, आपटे, मळेगाव, बेडीसगाव या गावांच्या हद्दीतील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागाने या गाईंना पकडून तानसा अभयारण्य किंवा अन्य जंगलात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
............
आमच्या शेतातील २०० आंब्यांच्या झाडांसह सोनचाफ्याची ५०० झाडे निलगाईंनी फस्त केली. वन विभागाने आम्हाला नुकसानभरपाई दिली पाहिजे. आम्ही पशूपक्षी, वन्यजीवप्रेमी आहोत. निलगाईंना मारहाण करणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावून या निलगाईंना पकडण्याची गरज आहे.
- गजानन विशे, बेडीसगाव, किन्हवली, शहापूर
.............
वाचली