धीरज परब
मीरा रोड: ओखी चक्रीवादळ व अवकाळी पावसाळा मुळे राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड,रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील मिठ उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे. साठवून ठेवलेले मीठ तसेच या हंगामामध्ये मिठ उत्पादनासाठी तयार केलेले वाफे, बांध-बंधारे पावसाने धुवून गेले व खराब झाल्याने सुमारे दोन महीने केलेली मेहनत, मजुरी आदी खर्च वाया गेलाय. यंदा मीठ उत्पादनावर देखील याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे . ओखीच्या तडाख्याचा फटका मच्छीमार, शेतकरी यांच्यासह शिलोत्री व मीठ उत्पादकांना देखील बसलाय .
जून ते सप्टेंबर हा सर्वसाधारण पावसाळी कालावधी असतो . महाराष्ट्र, केरळ या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पडत असल्याने पावसाळ्यात मिठागरातील वाफे अर्थात कोंडया पाण्याखाली बुडून खराब होतात. अंतर्गत कच्चे रस्ते व बांध-बांधार्यांचे देखील नुकसान होते. यंदाचा पावसाळा उशिरापर्यंत राहिला व सरते शेवटी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे मिठागरातील कोंडया, बंधारे यांचे प्रतिवर्षी पेक्षा जास्त नुकसान झाले.
पावसाळा संपल्यानंतर नवीन हंगामासाठी पावसाचे साचलेले पाणि बाहेर काढून, सुकवून पुन्हा समुद्राचे खारे पाणि आत घेऊन सर्व कोंडया शाकारून, चापून- चोपून [त्याला मोगरी मारणे म्हणतात] पुन्हा पूर्ववत कराव्या लागतात. टणक बनवाव्या लागतात [त्याला लादी बसवणे असे म्हणतात] आणि मग त्या कोंडयामध्ये, समुद्राचे खारे पाणि भरती द्वारे खाजण मध्ये साठवावे लागते . ते पाणी वाफ्या मध्ये फिरवून सूर्याचे उष्णतेने नैसर्गिक प्रक्रियेद्वारे २७ डिग्री पर्यंत तयार करावे लागते. तेव्हा कुठे सफेद, पांढरे शुभ्र, दाणेदार मिठ तयार व्हायला सुरुवात होते. या प्रक्रियेला सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. ४ डिसेंबर पर्यंत बर्याच मिठगरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत आलेली होती.
परंतु ओखी वादळाचा तडाखा आणि मुसळधार पावसामुळे कोंड्या व खाजण मध्ये पाणी साचले आहे . अंतर्गत कच्चे रस्ते , बांध बंधारे यांचे नुकसान झाले आहे . खाजण मध्ये साचलेले पाणी पावसाळी पाण्यामुळे पुन्हा गोडे झाले आहे . तसेच काही मिठागरामध्ये गतवर्षीचे साठवून ठेवलेले मिठ जोरदार अवेळी पावसा मुळे धुपून गेले. रस्ते खराब झाल्याने जुन्या मिठाची विक्री देखील थांबली आहे . वादळ आणि अवकाळी पावसामुळे केलेली मेहनत व खर्च वाया जाऊन मोठ्या प्रमाणावर मीठ उत्पादक शिलोत्र्यांचे नुकसान झाले आहे.
आधीच मीरा - भाईंदर, वसई, पालघर, पेण - पनवेल, भांडुप - वडाळा आदी परिसरातील बहुतांश मीठागरे हि वाढत्या नागरीकरणा मुळे अडचणीत आली आहेत . सांडपाणी, मलमूत्र हे प्रक्रिया न करताच थेट खाड्या व उपाखाड्यां मध्ये बेकायदेशीरपणे सोडले जात आहे . त्यामुळे खड्या प्रदूषित होऊन पर्यावरणाचा ह्रास, जलप्रदूषण होऊन जैवविविधता धोक्यात आलेली आहेच. परंतु मीठ उत्पादनावर देखील त्याचा अतयंत विपरीत परिणाम होत चालला आहे. मिठाचे उत्पादन घटत चालले असून आर्थिक नुकसान होत आहे. मीठ उत्पादनासाठी लागणारे समुद्राचे खारे पाणी भरती द्वारे या खाड्यामधूनच मिठगरामध्ये पोचते.
त्यातच ओखी वादळ व अवकाळी पाऊस या मुळे शिलोत्री व मीठ उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे . शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मीठ उत्पादक छोटे शिलोत्री संघ, राई चे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केली आहे . मीठ उत्पादकाच्या या नुकसान भरपाईसाठी तसेच विविध समस्यासाठी शिलोत्री संघटना तथा मिठ उत्पादक केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचे पाटील म्हणाले.