डोंबिवली : गणेशोत्सवाच्या तोंडावर केडीएमसीने आपल्या हद्दीतील रस्त्यांची डागडुजी केली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या अखत्यारित असलेल्या खंबाळपाडा येथून जाणाऱ्या न्यू कल्याण रोडकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही. या रस्त्यावरील खड्ड्यांबरोबरच धुळीच्या त्रासामुळे वाहनचालक व पादचारी पुरते हैराण झाले आहेत. त्यामुळे धूळधाणीतून सुटका होणार तरी कधी, असा सवाल ते विचारत आहेत.
टाटा पॉवरनाका ते घरडा सर्कल हा न्यू कल्याण रोड केडीएमसीच्या हद्दीत येत असला तरी त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. परंतु, या विभागाचे सातत्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील वर्षी या रस्त्यावर गटारासाठी बांधलेल्या खड्ड्यात पडून ललित संघवी या व्यापाºयाचा मृत्यू झाला होता. याबाबत मनसेने उठवला होता. त्यानंतर, काही प्रमाणात रस्ता दुरुस्त झाला होता. पण, काम निकृष्ट झाल्याचे खड्ड्यांमुळे स्पष्ट होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच या रस्त्यावर पथदिवे नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नाहीत. परिणामी, सातत्याने अपघात होत आहेत.
गणेशोत्सवात या रस्त्याची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, संबंधित विभागाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांमधून वाहने जाऊन खडीची माती झाली आहे. त्याच्या धुळीचा त्रासही वाहनचालक आणि पादचाºयांना होत आहे. आधीच हवामानातील बदलामुळे सर्दीखोकल्याचे विकार नागरिकांना जडले असताना त्यात धुळीच्या त्रासाची भर पडली आहे. याच मार्गावर महाविद्यालय आणि कंपन्या आहेत. त्यामुळे कामगार आणि विद्यार्थ्यांचाही रस्त्यावरील धूळधाणीमुळे श्वास कोंडतो आहे.नाल्याची सफाई न झाल्याने पाणी तुंबणे सुरूचच्न्यू कल्याण रोडवरील नाल्याची योग्य प्रकारे सफाई झालेली नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. आजही विकासनाका येथे दोन ते तीन फूट पाणी साचते. गुरुवारी पडलेल्या तासाभराच्या पावसाच्या वेळी हे चित्र पाहायला मिळाले.च्मुसळधार पावसात तर या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. याच रस्त्याच्या आजूबाजूला केमिकल कंपन्या तसेच बेकायदा थाटलेली मार्बलची दुकाने आहेत. या रस्त्यावर प्रदूषित पाण्याच्या प्रवाहाबरोबरच भोवताली पडलेल्या डेब्रिजच्या कचºयामुळे या मार्गाला एक प्रकारे अवकळा आली आहे.