हितेन नाईक, पालघरकेंद्र आणि राज्य शासनाने मच्छीमारांवर लादलेली पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर १ आॅगस्ट पासून मासेमारिला समुद्रात जाण्यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व किनारपट्टीवरील मच्छीमारांची एकच धावपळ उडाली आहे. समुद्रातील वादळी वारे आणि तुफानी लाटा पुरेशा शमलेल्या नसताना डोक्यावर असलेल्या कर्जाचे डोंगर दूर करण्यासाठी जीव मुठीत घेऊन आम्हाला मासेमारीला समुद्रात जावे लागत असून मासेमारी बंदीचा कालावधी घटवून सरकार आम्हाला वादळी समुद्रात मासेमारी करण्यास भाग पाडत असल्याची जळजळीत प्रतिक्रि या मच्छीमार सुभाष तामोरे यांनी लोकमत कडे व्यक्त केली. महाराष्ट्र मासेमारी अधिनियम १९८१ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने १४ आॅगस्ट १९६६ मधील दुरुस्ती नुसार सागरी मासेमारी (पावसाळी बंदी) कालावधी १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पोर्णिमा यापैकी प्रथम येईल तो दिवस असा ठेवला होता. अशावेळी नारळी पौर्णिमेला विधिवत समुद्राची पूजाअर्चा करून सर्व मच्छीमार आपल्या नौका घेऊन समुद्रात मासेमारीला जात होत्या. त्यामुळे पावसाळी मासेमारी बंदी कालावधी मध्ये मासे व सागरी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होऊन मत्स्य संवर्धन होत असते. या कालावधीत समुद्रात नद्या द्वारे मोठ्या प्रमाणात खनिजद्रव्ये वाहत येऊन समुद्रात मिसळतात तसेच पाण्याच्या क्षारतेचे प्रमाण कमी होते आणि अपवेलिंग होऊन समुद्राच्या तळातील मूलद्रव्ये पाण्याच्या वरच्या थरात येतात, त्यामुळे प्लवंग निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन माशांच्या पिल्लांचे संवर्धन आणि पोषण चांगले होत असते. तसेच एकी कडे माशांच्या साठ्यांत वृद्धी होत असताना दुसरीकडे मच्छीमारांच्या जीवित व वित्त हानीची शक्यताही मोठी असते. म्हणून पालघर, ठाणे जिल्ह्यातील मच्छीमार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीची काटेकोर अमलबजावणी मागील अनेक वर्षा पासून करीत असतात. पालघर जिल्ह्यातील अनेक मच्छीमार संस्था आणि ठाणे (पालघर) जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाच्यावतीने १५ मे पासूनच आपल्या संस्थेच्या नौका बंद ठेवून मत्स्य संपदेमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बऱ्या पैकी यश येत असल्याचे दिसून आले असतांना सारकारने या कालावधीत घट केली आहे. समुद्रात प्राणहानी आणि वित्तहानीचे संकटपालघर, डहाणू तालुक्यातील मच्छीमारांच्या नौके मध्ये खलाशी कामगार म्हणून काम करण्यासाठी विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू इ. भागातील आदिवासी समाजातील पुरुष वर्ग हजारोच्या संख्येने प्रमाणात जात असतांना सध्या शेतीची लावणीची, खत फवारणी, मशागत इ. कामे अपूर्णावस्थेत आहेत. अशा वेळी हा मोठा वर्ग आला नाहीतर मासेमारी व्यवसाया पुढे मोठे संकट उभे राहू शकते. त्यातच समुद्रातील वादळे अजून पुरेशी शमली नसतांना शासनाच्या परिपत्रका नुसार १ आॅगस्ट पासून मासेमारीला सुरुवात करण्याशिवाय मच्छीमारा पुढे कुठलेही गत्यंतर उरलेले नाही. त्यामुळे समुद्रात प्राणहानी आणि वित्तहानीची घटना घडल्यास शासनाच्या १ लाखाच्या तुटपुंज्या मदत निधीसाठी आम्ही आमच्या कुटुंबियांचे अमूल्य जीवन धोक्यात घालायचे का? असा प्रश्न मच्छीमार महिला विचारात आहेत. कोट्यवधीचे परकीय चलन देशाला देणारा, मोठा रोजगार मिळवून देणारा हा मच्छीमार व्यवसाय यामुळे डबघाईला येण्याची शक्यता आहे.जून १९७६ साली समुद्रात झालेल्या वादळात पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टीवरील विशेषत: वसई तालुक्यातील बहुतांशी बोटी बुडाल्या होत्या. तसेच २३ व २४ जुलै १९७९ रोजी झालेल्या वादळात रायगड-मुंबई बंदरातील (ससून डॉक) समुद्रात मासेमारीला गेलेले ७२ ट्रॉलर्स बुडून ३२५ मच्छीमार बेपत्ता होऊन मृत्यूमुखी पडले होते. अशा दुर्देवी घटना डोळ्या समोर असताना शासनाने १ जून ते ३१ जुलै असा फक्त ६१ दिवसांचा मच्छीमारी बंदीचा कालावधी खूपच कमी जाहीर केल्याने पालघर, गुजरात राज्यातील मच्छीमार संघटना तसेच, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती या संघटना या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवीत आहेत. परंतु मत्स्यव्यवसाय खात्याचे काही अधिकारी व मंत्रालयीन पातळीवरचे आयुक्त दर्जाचे अधिकारी मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची आणि शासनाची दिशाभूल करून बंदी कालावधी दिवसेंदिवस घटवित आहेत असाही आरोप करीत आहेत.
जीव धोक्यात घाला,मच्छीमारी लवकर करा
By admin | Published: July 25, 2016 2:50 AM