कल्याण : कोरोनाचे ८० टक्के रुग्ण सौम्य लक्षणे असलेले आढळून येत आहेत. सौम्य लक्षणे आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याकडून कोरोना पसरण्याची जास्त शक्यता असते. कोरोनाशी लढा देत असताना कोरोनापासून दूर राहणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने डोंबिवली जिमखान्यातील बास्केटबॉल हॉलच्या जागेत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे आॅनलाइन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा.डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे, भाजप आ. रवींद्र चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, विश्वनाथ राणे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री ठाकरे यांनी विमान अपघाताचा दाखला देत अपघातग्रस्तांना वाचविण्यासाठी गेलेल्या २६ जणांना कोरोनाची लागण झाली, याकडे लक्ष वेधले. कोरोनाचे रुग्ण सुरुवातीला सापडत असताना राज्यात केवळ दोन लॅब होत्या.आता गेल्या चार महिन्यांत राज्यभरातील कोरोना टेस्टिंग लॅबची संख्या २८५ झाली आहे, असे ठाकरे म्हणाले. यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींनी जी मेहनत घेतली, याचा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये उभारली जात असली, तरी त्यांचा वापर करण्याची वेळ येऊ नये, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.उपमुख्यमंत्री पवार, आरोग्यमंत्री टोपे, महसूलमंत्री थोरात यांनी पालकमंत्री शिंदे यांच्या घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.पालकमंत्री शिंदे म्हणाले की, कोविड रुग्ण बरे होण्यात ठाणे शहराचा देशात दुसरा, तर राज्यात पहिला क्रमांक आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचा रुग्ण बरे होण्याचा दर हा राज्यात दुसराआहे.>मास्कमुळे टोपेंचा उल्लेख राहिलाआॅनलाइन लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सर्वांचा उल्लेख केला, तेव्हा राजेश टोपे यांचा उल्लेख राहून गेल्याची आठवण उपमुख्यमंत्री पवार यांनी करून देताच मुख्यमंत्र्यांनी राजेशने मास्क घातला आहे. ते आपल्यासोबतच आहेत. सोबत असल्यामुळे दिसत नाही, अशी टिप्पणी केली. त्याचबरोबर कोविड रुग्णालय जिमखान्याच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात उभारले आहे. मात्र, गरज भासल्यास जिमखान्यास दुसरी जागा देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी गमतीने म्हटल्यावर उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांकडूनही धोका- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:06 AM